टाकळीभान येथे भरदिवसा वृध्द महिलेची लूट

टाकळीभान येथे भरदिवसा वृध्द महिलेची लूट

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

पूजा करण्याचा बहाणा करुन दुचाकीवरुन आलेल्या दोन ठगांनी येथील 70 वर्षे वयाच्या एका वृध्द महिलेला भरदिवसा लुटले. या वृद्धेची सुमारे 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लुटुन त्यांनी पोबारा केला. ही घटना काल शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान घडली.

येथील मेन पेठेत राहत असलेल्या वयोवृध्द महिला सिताबाई रामसुख गलांडे या सायंकाळी 4 वाजता विरंगुळा म्हणून त्यांच्या घरासमोरील टाकळकर यांच्या वाड्याच्या ओट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन हेल्मेट घातलेले दोन तरुण त्यांच्याजवळ येऊन थांबले व विठ्ठल मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ते दाखवता का? आम्हाला आईच्या शांतीसाठी पूजा करावयाची आहे असे सांगू लागले. विठ्ठल भक्त असलेल्या सिताबाई जवळच असलेले विठ्ठल मंदिर दाखविण्यासाठी गेल्या. मात्र त्या ठगांनी पुन्हा सांगितले की प्रथम मारुती मंदिरात पूजा करुन यावे लागेल. मारुती मंदीर थोडे दूर असल्याचे सिताबाईंनी सांगताच ते आम्हाला दाखवा, आमच्या दुचाकीवरुन आपण जावू असे ठगांनी सांगितल्यामुळे सिताबाई त्यांना घेऊन मारुती मंदिरात गेल्या. तेथे या ठगांनी आमच्या आईची शांती पूजा असल्याने तुम्ही पुजेसाठी बसा, असा आग्रह धरला.

त्यावर थातूर मातूर पूजा मांडून ठगांनी पुजेला सुरवात केली. पूजा सुरु असताना एक जण म्हणाला की, तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत पुजेच्या कापडावर ठेवा. तशी सिताबाईंनी गळ्यातील पोत काढुन पुजेच्या कापडावर ठेवली. इच्छीत साध्य झाल्याने एक ठग नारळ आणण्याच्या बहाण्याने मारुती मंदिराच्या बाहेर गेला. पाच मिनिटांच्या अवधीने नारळ आणायला गेलेला अद्याप का आला नाही, हे पहाण्यासाठी दुसराही मंदिराबाहेर गेला तो आलाच नाही. सिताबाई मात्र पुजेच्या कापडाला राखण बसून राहिल्या.

काही वेळाने त्यांनी समोरच्या महिलेला बोलावले व झालेल्या घटनेची माहिती दिली. त्या महिलेने पुजेला ठेवलेले कापड तपासले असता त्यात सोन्याच्या पोतीऐवजी खडे दिसून आले. हे सर्व पाहुन वृध्द सिताबाईंनी दिवसा ढवळ्या लुटल्याचे सांगत टाहो फोडला. या घटनेची माहीती टाकळीभानमध्ये पसरताच अनेकांनी वृध्द महिला लुटली गेल्याने हळहळ व्यक्त केली. मात्र या घटनेतून इतर वृध्दांनी बोध घेऊन अनोळखी इसमावर विश्वास ठेवू नये व कोणतीही माहिती त्यांना देवू नये. शक्यतो वृध्द महिलांनी मौल्यवान वस्तू जवळ बाळगू नयेत, असा सल्ला अनेकांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com