टाकळीभान येथे‘नो व्हॅक्सिन नो रेशन’चा निर्णय

सर्वपक्षीय बैठकीत करोनाबाबत कडक उपाययोजना करण्यावर एकमत
टाकळीभान येथे‘नो व्हॅक्सिन नो रेशन’चा निर्णय

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

ग्रामस्थ, दुकानदार यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच घरोघरी जाऊन लस न घेतलेल्यांची यादी करून त्यांचे लसीकरण करून घेण्यात येणार असून ‘नो व्हक्सिन नो रेशन’चा निर्णय टाकळीभान येथे काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

टाकळीभान येथे करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायतीच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ, दुकानदार यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असून व मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, तसेच घरोघरी जाऊन लस न घेतलेल्यांची नावांची यादी करून त्यांचे लसीकरण करण्याचा व जे नागरिक लसिकरण करून घेणार नाहीत त्यांचे स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे रेशन बंद करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकर्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टाकळीभान येथे करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी आढावा बैठक घेत सूचना केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीला करोनाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले की, गावच्या मानाने पाहिजे तितके लसीकरण झाले नसून आदिवासी समाजाचे लसीकरण राहिले आहे. घरोघरी जाऊन लस न घेतलेल्यांची नावे घेऊन त्यांचे लसीकरण करण्यात येईल तसेच लस न घेतलेल्या दुकानदारांचे लसीकरण करण्यात येईल. दसरा, दिवाळी सणांना बाजारपेठेत गर्दी होणार नाही यासाठी खास उपाययोजना करण्यात येईल.राजेंद्र कोकणे म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड टेस्ट करताना आधारकार्ड सक्तिचे करावे, जेणेकरून टाकळीभानचा करोना रुग्णांचा आकडा फुगणार नाही.

माजी उपसरपंच भारत भवार यांनी बाजारात मास्क नसलेल्या व्यापारी, शेतकरी यांना बाजारात बसू देऊ नये व बाजार करणार्‍यांना मास्क नसल्यास बाजारात प्रवेश करू देऊ नये याबाबत ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्याची सूचना केली. भाजपाचे बंडू हापसे यांनी गावात रिक्षा फिरवून मास्क वापरण्याचे आवाहन करावे, तसेच मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, सर्वांचे लसीकरण करण्यात यावे तरच करोना संसर्गाला आळा बसेल, असे सांगितले.

यावेळी कामगार तलाठी अरूण हिवाळे, ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राम बोरूडे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, बापूराव त्रिभुवन, दत्तात्रय नाईक, शिवाजीराव शिंदे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, आरपीआयचे आबासाहेब रणनवरे, भाजपाचे नारायण काळे, अनिल बोडखे, पाराजी पटारे, यशवंत रणनवरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, भाऊसाहेब पटारे, भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, हर्षद डुकरे, दिलीप गलांडे, सुनील रणनवरे, जालिंदर हुळहुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

करोनाबाबत उपाययोजनेसाठी ग्रामपंचायतीत आयोजित बैठक महत्त्वाची व आरोग्याशी संबंधित असताना सरपंच अर्चना रणनवरे व महिला ग्रामपंचायत सदस्या उपस्थित नाहीत ही गावाच्यादृष्टीने लाजीरवाणी बाब आहे. गावाच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने या बैठकिस त्यांची उपस्थिती गरजेची होती. करोनाबाबत उपाययोजना करण्याविषयी ग्रामपंचायतीला तीन महिन्यांपूर्वीच सांगितले होते. मात्र त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याची खंत भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com