टाकळीभान येथे दगडाला प्रतीकात्मक दुग्धाभिषेक करून सरकारचा निषेध
सार्वमत

टाकळीभान येथे दगडाला प्रतीकात्मक दुग्धाभिषेक करून सरकारचा निषेध

Arvind Arkhade

टाकळीभान|वार्ताहर|Takalibhan

करोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेती उत्पादनाचे तीनतेरा वाजून अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांचा जोडधंदा असलेल्या दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांना या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकार दुर्लक्ष करीत असल्याने येथील दूध उत्पादकांनी दगडावर दूध ओतून प्रतिकात्मक अभिषेक करून सरकारी धोरणाचा निषेध केला.

यावेळी बोलताना माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की, करोनाच्या संकटामुळे शेतमालाचे बाजारभाव पडले आहेत. शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाइतकाही मोबदला मिळत नाही. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकर्‍यांनी दूध व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र या करोनाच्या संकटात दुधाचेही दर कमी झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकर्‍यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने लिटरला 10 रुपये दरवाढ करुन 30 रुपये लिटरने दुधाची खरेदी करावी किंवा 10 रुपये लिटर प्रमाणे अनुदान शेतकर्‍यांच्या थेट खात्यात वर्ग करावे, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.

यावेळी दूध उत्पादक शेतकरी भास्करराव साळुंके, दत्तात्रय कापसे , प्रहारचे नवाज शेख, रघुनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शंकर शिंदे, अविनाश लोखंडे, दीपक पवार, आप्पा रननवरे, सुनील दाभाडे, बापूराव शिंदे, अनिलकुमार शर्मा, विजय लाड, बाळासाहेब शेळके, नवनाथ खंडागळे, सोन्याबापू म्हस्के, दीपक कोकणे, मायकल रननवरे, सुनील त्रिभुवन आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com