टाकळीभानचा लॉकडाऊन तीन दिवस वाढवला

टाकळीभानचा लॉकडाऊन तीन दिवस वाढवला

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

येथील करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन करोना रुग्णाचा आढावा घेत खबरदारी म्हणून टाकळीभान 14 मे ते 20 मे पर्यत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र करोना संसर्ग अपेक्षित कमी होत नसल्याने शुक्रवार, शनिवार व रविवार असा तीन दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन पुन्हा जाहीर करण्यात आल्याची माहिती उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी दिली आहे.

टाकळीभान येथे गेल्या काही दिवसात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने 7 दिवसांचा सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत लॉकडाऊन घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याची काल गुरुवारी मुदत संपत होती. मात्र 15 मे ते 18 मे या कालावधीचा आढावा घेतला असता गावात 11 कोरोना बाधित रुग्ण आढळले. कोरोना रुग्ण संख्या घटत असल्याने गावासाठी ही बाब दिलासादायक असली तरी 19 मे रोजी 06 करोना रुग्ण आढळले असून त्यात एका बालकांचा 1 समावेश आहे. करोना संसर्गाने 1 मृत्यू झाला आहे.

खळवाडी भागात 18 मे रोजी 2 करोनाबाधित रुग्ण व 19 मे रोजी 3 करोनाबाधित रुग्ण आढळले असून आज 20 मे रोजी अ‍ॅटीजेन रॅपिड टेस्टमध्येही करोनाबाधित रुग्ण आढळत असून गावात करोना संसर्ग वाढु नये म्हणून गाव पुन्हा दि. 21 ते 23 मे पर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार व रविवार शासनांचा बंद असल्यामुळे व्यापारी वर्गाने लॉकडाऊन वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. यांची ग्रामस्थांनी व व्यापारी बांधवानी नोंद घ्यावी.

तसेच खळवाडी परीसरात रुग्ण संख्येचा आलेख वाढता असल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक ठिकाणी फिरु नये तसेच या परिसरात गर्दी करु नये. शंका आल्यास चाचणी करुन घ्यावी. टाकळीभान ग्रामपंचायत विविध उपाययोजना राबवत असून कुठल्याही स्वरुपाची अडचण असल्यास ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन सरपंच अर्चना रणनवरे व उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी केले आहे.

टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परीसरातील आठ गावातील नागरिकांची कोरोना अँटीजन चाचणी केली जात आहे. मात्र बर्‍याचदा चाचणीसाठी आलेले परीसरातील नागरीक नाव, पत्ता व चुकीचा मोबाईल नंबर देतात. काही नागरीक टाकळीभानचाच रहिवाशी असल्याचा पत्ता देतात. त्यामुळे असा करोनाग्रस्त नागरीक शोधण्यास अडचणी तर येतातच. शिवाय त्यामुळे टाकळीभानच्या रुग्णांचा आकडा फुगलेला दिसतो. त्यासाठी चाचणी करताना आधारकार्ड तपासुनच खरी माहिती आरोग्य कर्मचार्‍यांनी नोंदवावी, अशीही मागणी उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी आरोग्य केंद्राकडे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com