टाकळीभान 7 दिवस लॉकडाऊन; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

टाकळीभान 7 दिवस लॉकडाऊन; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे करोना रूग्णांची संख्या वाढली असून वाडगाव व बेलपिंपळगाव रस्ता करोनाचा हॉट स्पॉट झाला असून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाकळीभान येथे शुक्रवार दिनांक 14 मे ते गुरूवार दि. 20 मे या दरम्यान 7 दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या बैठकित घेण्यात आला.

काल ग्रामपंचायतीच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात आयोजित केलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला आहे. टाकळीभानसह खळवाडी परिसरातही मोठ्या प्रमाणात रूग्ण आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाकळीभान कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.

शुक्रवार ते गुरूवार या दरम्यान 7 दिवस गाव लॉकडाऊन करण्यात येणार असून या कालावधीत फक्त दवाखाने, मेडिकल, व दुध संकलन केंद्र सुरू ठेवण्यात येणार असून इतर सर्व व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी फेरी मारून भाजीपाला विक्री करावी, मटका, दारू विक्री बंद ठेवण्यात आलेली असून मटन विक्रेत्यांनी नागरिकांच्या मागणीवरून घरी जावून मटन पार्सल द्यावे. मेडिकल दुकानदारांनी मेडिकल चालू ठेवणे व बंद ठेवणे हे त्यांच्या इच्छेनुसार करावे. इतर दुकाने चालू आळून आल्यास आकराशे रूपये व दुसर्‍यांदा दुकान चालू आढळल्यास 5 हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या भागात रूग्ण संख्या जास्त आहे त्या भागात रेड झोन फ्लेक्स बोर्ड लावण्यात येणार असल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे व ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यांनी यावेळी सांगितले.

टाकळीभान येथे वाढती करोना रूग्ण संख्या पहाता ग्रामस्थांनी नियमाचे पालन करावे, करोनाबाधीत रूग्णांनी गावात फिरू नये, सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, सर्वांनी ग्रामपंचायतला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव व सदस्यांनी व करोना समितीने केले आहे.

यावेळी माजी सरपंच मंजाबापू थोरात, अशोक कारखान्याचे संचालक दत्तात्रय नाईक, बापूराव त्रिभुवन, लोकसेवा महाविकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, कामगार तलाठी अरूण हिवाळे, भारत भवार, राहूल पटारे, अविनाश लोखंडे, आबासाहेब रणनवरे, संजय रणनवरे, राजू रणनवरे, यशवंत रणनवरे, नारायण काळे, नवाज शेख,ृ ऋषि धोंडलकर, संजय पटारे, बंडू हापसे, विकास मगर, बापूसाहेब शिंदे, प्राचार्य जयकर मगर, भाऊसाहेब पटारे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com