टाकळीभान लिंक लाईनचे काम ठेकेदाराच्या मनमानीने रखडले

24 तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न हवेत
टाकळीभान लिंक लाईनचे काम ठेकेदाराच्या मनमानीने रखडले

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेला 24 तास पाणीपुरवठा करून पाणी टंचाईचे संकट दूर व्हावे, यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आ. लहु कानडे यांनी 17 लाखांचा घसघशीत निधी दिला असताना कामाचे भुमिपूजन होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी अद्याप प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा झाला नाही. या योजनेच्या ठेकेदाराच्या मनमानीमुळे लिंक लाईनचे काम रखडल्याने किमान वर्षभरासाठी तरी ग्रामस्थांचे 24 तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न हवेत विरले आहे.

टाकळीभान गावची वाढती लोकसंख्या, सततचे विजेचे भारनियमन व केवळ 8 तास विजेमुळे होणारा कमी पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना सतत पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. टेलटँक परिसरात ग्रामपंचायतीची मुख्य पाणीपुरवठा योजना आहे. सुमारे अडीच कोटींचा शासकीय निधी खर्च करून पाणी पुरवठा योजनेपासून 3 कि. मी. अंतराची जलवाहिनी टाकून नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे. गावची वाढलेली लोकसंख्या व विजेचे 16 तासांचे भारनियमन होऊन केवळ 8 तास पाणी पुरवठा योजनेला वीज मिळत असल्याने पाणी टंचाई नागरीकांच्या पाचवीला पुजलेली होती. भारनियमनाच्या वेळेतही बदल होत असल्याने रात्री अपरात्री नागरिकांना पाण्यासाठी जागरण करावे लागत होते.

याबाबत कार्यकर्त्यांनी व काही प्रमुख ग्रामस्थांनी आ. लहु कानडे यांच्याकडे कैफियत मांडून ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 24 तास वीज उपलब्ध व्हावी व त्यासाठी लिंक लाईन योजनेसाठी निधी मिळावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार आ. कानडे यांच्या आदेशानुसार महावितरण विभागाने आराखडा तयार करून योजनेसाठीचा 17 लाखांचा अपेक्षित खर्च असल्याचा अहवाल आ. कानडे यांना दिला होता. पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा प्रश्न असल्याने आ. कानडे यांनी त्वरीत 17 लाखांचा निधी या कामासाठी मंजूर केला. त्यानुसार या कामासाठी ठेकेदार कंपनीची नियुक्ती करून 5 जून 2022 रोजी आ. कानडे यांच्याहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भुमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. तत्काळ काम सुरू करून 15 दिवसांत योजना कार्यान्वीत करण्याचे आदेश आ. कानडे यांनी ठेकेदार कंपनीला दिले होते.

भूमिपुजनानंतर सुमारे दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असला तरी ठेकेदार कंपनीच्या मनमानीमुळे काम सुरू झालेले नाही. काही प्रमाणात सिमेंट पोलचा ढीग टाकण्याशिवाय कामात प्रगती झालेली नाही. भूमिपूजन प्रसंगी संपूर्ण शेतशिवार मोकळे असल्याने जलद गतीने काम पुर्ण झाले असते. मात्र आता खरीप हंगामाची पेरणी झाली असल्याने अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकर्‍यांचा कामाला विरोध असणार आहे. किंवा शेतकर्‍यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाणार आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने शेतपरीसर चिखलमय झालेला असल्याने लिंक लाईनच्या कामाला अडचण येणार आहे. ठेकेदार कंपनीच्या मनमानीमुळे या योजनेचे काम रखडल्याने किमान वर्षभरासाठी ही योजना लोंबकळत पडून नागरिकांना 24 तास पाण्यासाठी आता किमान वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com