
टाकळीभान |वार्ताहर|Takalibhan
शासकीय परिपत्रकानुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्यय दिनी होणार्या ग्रामसभेचे काल 30 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या सत्तेतील दुहीचा परीणाम कालच्या ग्रामसभेत चांगलाच उमटला. सर्वसामान्य महिलांनीच ग्रामसभा हातात घेवून सदस्यांवर समस्यांचा पाऊस पाडला. प्रथमच मोठ्या प्रमाणात समस्या घेवून महिला उपस्थित राहिल्या व माईकवर ताबा घेवून समस्या मांडल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपध्दतीचे चांगलेच पितळ उघडे पडले. सुमारे तीन तासापेक्षा जास्त वेळी गदारोळात ग्रामसभा सुरु होती.
ग्रामपंचायत सदस्य मंडळातील गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या गटबाजीच्या राजकारणाचा फटका नागरिकांना मुलभूत सुविधा मिळण्यात झाल्याने ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वसाधारण कुटूंबातील महिलांनी ग्रामसभेला हजेरी लावली. महिलांनी घरकुल, पाणी, स्वच्छता, रस्ते, विविध दाखले या मुलभूत समस्या सोडल्या जात नसल्याने सदस्य मंडळाची खरडपट्टी केली. सर्व सहा प्रभागातील महिलांनी तळमळीने समस्या मांडून आमच्या मतावर निवडून आलेले सदस्य आमच्या मुलभूत समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याने समस्यांचा डोंगर उभा राहिल्याच्या जळजळीत प्रतिक्रिया ग्रामसभेत व्यक्त केल्या. प्रथमच व्यासपीठावर महिला तर समोर रखरखत्या उन्हात गावपुढार्यांना बसण्याची वेळ आली. शितल मोरे, गिताबाई शिंदे, सविता रजपुत, सुमन शिंदे, इंदुबाई गाढे, श्रीमती रणनवरे, कविता शेळके व इतर महिलांनी पोटतिडकीने समस्या मांडून ग्रामपंचायत प्रशासनाचे वाभाडेच काढले.
ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच व केवळ दोन सदस्य उपस्थित असल्याने गैरहजर सदस्यांवर कारवाईचा ठराव करण्याची मागणी रामेश्वर आरगडे यांनी करुन ग्रामपंचायतकडून अंगणवाडी सेविकांची गर्दी करण्यासाठी होत असलेला वापर बंद करण्याचा ठराव करण्यात आला. वृध्द आई वडिलांना न सांभाळणार्या मुलांना वारसा हक्काने मिळणारी संपत्ती देण्यात येवू नये असा ठराव देवदास कोकणे यांनी ग्रामसभेत मांडला. तर विरोधक बिनबुडाचे आरोप करुन चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत ते थांबवावे असे सोसाटीचे माजी चेअरमन राहुल पटारे म्हणाले.
यावेळी मंजाबापु थोरात, पाटीलबा पटारे, बापु शिंदे, नाना नवले, अण्णासाहेब दाभाडे, अनिल बोडखे, नारायण काळे, अमर हिवाळे, संजय रणनवरे, भाजपाच्या सुप्रिया धुमाळ, भारत भवार, पाराजी पटारे यांनी विविध समस्या मांडत टिका केली.
गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने प्रभाग 2 मधील बापुसाहेब नवले घरातील पाण्याचे रिकामे भांडे घेवून ग्रामसभेत आले होते. ते म्हणाले, ग्रामपंचायत सदस्यांकडे पाण्याची भिक मागण्यासाठी आलो आहे. नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास हे सदस्य मंडळ अपयशी ठरले आहे. पाणी व सुविधा देण्यास फोल ठरलेल्या सदस्यांनी त्वरीत राजीनामे द्यावेत. केवळ कमिशनसाठी खुर्चीवर बसलेल्या सदस्यांचा निषेध करतो. पाण्यावाचून नागरीकांना मारणार असाल व कामकाजात सुधारणा होणार नसेल तर येत्या ग्रामसभेत आत्मदहन करण्याचा इशारा नवले यांनी दिला.
यावेळी ज्ञानदेव साळुंके, कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे, राजेंद्र कोकणे, आबासाहेब रणनवरे, विलास दाभाडे, भाऊसाहेब पवार, अनिल दाभाडे, यशवंत रणनवरे, रमेश पटारे, अविनाश लोखंडे, बाबासाहेब तनपुरे, रावसाहेब मगर, बाबासाहेब बनकर, मधुकर कोकणे, बंडु हापसे, चित्रसेन रणनवरे, बापुराव त्रिभुवन, जयकर मगर, रघुनाथ शिंदे, महेंद्र संत, सुधीर मगर, अॅड. धनराज कोकणे, संजय पटारे, संतोष रणनवरे, गणपत डुकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारकडे ग्रामपंचायतीचा 6 लाख 31 हजाराचा कर थकलेला आहे. या कराच्या वसुलीसाठी उपबाजारला आठ दिवसाची मुदत देण्यात यावी व कर वसुल करावा अन्यथा येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याची कार्यवाही करावी. तसेच बाजार समितीकडे दिलेल्या तीन एकरापेक्षा जास्त जागा आसल्याने मोजणी करुन जास्तीची जागा काढून घेण्यात यावी, असा ठराव करावा. तसेच येथील अनिता पोपट बारहाते यांच्या साई पेट्रोलपंपाडे 1 लाख 40 हजाराचा कर थकित असल्याने त्यांच्यावरही कारवाईचा ठराव करण्यात यावा.
- कान्हा खंडागळे, उपसरपंच, ग्रा. पं. टाकळीभान
सरकारी जागेतील रहिवाशी अतिक्रमण महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने लवकरच मार्गी लागून 200 घरकुलांचे काम रहात्या जागेवरच सुरु होणार आहे. घरकुलाचा 7/12 उताराही देण्यात येईल.ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, घरकुल या प्रश्नाबाबत जागृत राहिले पाहिजे.
- नानासाहेब पवार, माजी सभापती
ग्रामसभा ही सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी असते. परंतु विरोधकांनी गावातील भोळ्या भाबड्या स्त्रियांची दिशाभूल करत त्यांना बोलण्यास भाग पाडले आणि ग्रामपंचायतीची जाणूनबुजून बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला.
- अर्चना रणनवरे, सरपंच