सत्ता ही कोणाची जहागिरी नाही, सामान्यांचे प्रश्न सोडवा - पवार

मोठ्या पोलिस बंदोबस्तात टाकळीभानची ग्रामसभा शांततेत
सत्ता ही कोणाची जहागिरी नाही, सामान्यांचे प्रश्न सोडवा - पवार

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

ग्रामपंचायत ही सर्वसामान्यांना सुविधा देण्याचे साधन आहे. त्यामुळे या सत्तेचा वापर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच झाला पाहीजे. सदस्यांनी कुरघोडीचे राजकारण बंद करावे. सत्ता ही कोणाची जहागिरी नाही, असे प्रतिपादन माजी सभापती नानासाहेब पवार यांनी टाकळीभान ग्रामपंचातीच्या ग्रामसभेत केले.

गेल्या 15 ऑगस्ट रोजी पुर्वापार होणारी ग्रामसभा रद्द झाल्याने काल मंगळवारी ग्रामसचिवालयाच्या प्रांगणात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या.ग्रामसभा वादळी होणार असल्याचे संकेत प्रशासनाला मिळाल्याने प्रथमच मोठ्या पोलिस फौजफाट्यात सभा सुरु करण्यात आली.

यावेळी पवार म्हणाले की, सत्ता येते-जाते. सत्ता कोणाची जहागिरी नाही. मात्र मिळालेल्या सत्तेचा वापर हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहीजे. सदस्यांमधील कुरघुडीच्या खेळाचा विकासावर परिणाम होत आहे. घरकुले, अंतर्गत रस्ते, पाणी हे मोठे प्रश्न आहेत. मात्र ही कामे न करता सदस्य कर्तव्यात कसुर करीत आहेत. आगामी काळात गावठाण वाढीचा प्रश्न सोडविला जाणार असुन घरकुलांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ग्रामविकास अधिकारी यांची मुलभुत प्रश्नाची सोडवणुक करण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी जबाबदारीने काम पार पाडावे, असे आवर्जून सांगत गावच्या विकासासाठी सदस्यांनी गट-तट न करता एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

इगो बाजूला ठेवावा - थोरात

सदस्य मंडळावर गावाच्या विकासाची जबाबदारी आहे. राजकारणापुरते राजकारण करुन गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद बाजूला ठेवुन काम करणे गरजेचे आहे. माजी सभापती पवार यांच्या गटाचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव होऊनही ते सदैव लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहेत. मतदारांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी सदस्यांनी आपसातील हेवेदावे व ‘इगो’ बाजूला सारुन काम करा. गावाची प्रतिमा मलिन करण्याचे काम करु नका, असा सबुरीचा सल्ला माजी सरपंच मंजाबापू थोरात यांनी यावेळी दिला. यावेळी भाजपाचे नारायण काळे यांनी, विविध प्रश्न मांडुन सर्वसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची मागणी केली. बापूसाहेब शिंदे यांनी, स्वाध्याय मंदिर स्वाध्याय परिवारच्या ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी बंडु हापसे, बापुसाहेब नवले, मल्हार रणनवरे, बाळासाहेब पवार, राजु रणनवरे यांनी चर्चेत भाग घेतला. कामगार तलाठी अरुण हिवाळे, आरोग्य विभागाचे भाऊसाहेब चांदणे, महावितरणचे कैलास घोळवे, पशु वैद्यकीय आधिकारी डॉ. दिलीप कोकणे, शिक्षण विभागाचे सोनवणे यांनी विविध योजनांची माहीती देऊन लेखाजोखा सादर केला.

यावेळी ज्येेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, दत्तात्रय नाईक, शिवाजी शिंदे, भारत भवार, विलास दाभाडे, यशवंत रणनवरे, बाबासाहेब बनकर, भास्करराव कोकणे, रावसाहेब मगर, अबासाहेब रणनवरे, जयकर मगर, चित्रसेन रणनवरे, भाऊसाहेब पवार, मोहन रणनवरे, महेंद्र संत, संजय रणनवरे, कृष्णा वेताळ, नवाज शेख, रघुनाथ शिंदे, अप्पासाहेब रणनवरे, अविनाश लोखंडे, सुप्रिया धुमाळ, नानासाहेब रणनवरे, बाबासाहेब तनपुरे, विलास सपकळ तसेच ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप मिटके व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. रविंद्र पवार, अर्जुन बाबर, पो. ना. अनिल शेंगाळे, सगळगिळे, हे. कॉ. लावरे, गोल्हार, होमगार्ड औटी, नागुडे, लोणारे, साबळे आदींनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वादळी होणारी ग्रामसभा शांततेत पार पडली.

तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात चांगला नावलौकिक असलेल्या टाकळीभान गावची ग्रामसभा पोलिस बंदोबस्तात घ्यावी लागते, ही शरमेची बाब आहे. सदस्यांमध्ये कुरघुडीचे राजकारण खेळले जात असल्याने नागरिक नेहमीच दहशतीखाली आहेत. त्यामुळे गावाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे सदस्यांनी कुरघुड्या थांबवून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एकदिलाने काम करावे.

- राजेंद्र कोकणे, माजी उपसरपंच, टाकळीभान

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com