टाकळीभान ग्रामपंचायतीच्या कराचे 67 थकबाकीदार लोकअदालतमध्ये हजर

तडजोडीने सुमारे 70 हजाराचा रोख वसुल
टाकळीभान ग्रामपंचायतीच्या कराचे 67 थकबाकीदार लोकअदालतमध्ये हजर

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

ग्रामपंचायत कराच्या वर्षानुवर्षाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ग्रामपंचायत थेट लोकअदालतमध्ये गेली असल्याने 67 थकबाकीदारांना काल झालेल्या लोकन्यायालयात हजर होण्याच्या नोटीसा बजावल्याने तडजोडीने सुमारे 70 हजाराचा रोख वसुल झाला.

ग्रामपंचायत कराची काही नागरिकांकडे वर्षानुवर्षे बाकी थकलेली आहे. सुमारे 10 हजारापासून ही थकबाकी एक लाखाच्या वर गेली असून यात काही प्रतिष्ठीत थकबाकीदार आहेत. ग्रामपंचायत कराची रक्कम मोठ्या प्रमाणात थकल्याने ग्रामसुविधा, नोकर पगार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने त्याचा विकासावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या थकबाकीदारांकडील थकबाकी वसुलीसाठी न्याय व विधी मंत्रालयाने पुढाकार घेतल्याने लोकन्यायालयात तडजोडीने थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

श्रीरामपूर न्यायालयात काल दि. 25 सप्टेबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात टाकळीभान ग्रामपंचायतीने सुमारे 67 थकबाकीदारांचे दावे तडजोडीसाठी दाखल केले होते. हे सर्व थकबाकीदार 10 हजार ते 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेले होते. लोकन्यायालयात हजर होण्याच्या नोटीसा त्यांना देण्यात आल्या होत्या. या 12 लाख 73 हजार 770 रुपये थकबाकीदारांपैकी काही प्रतिष्ठीत, काही नोकरदार तर बाकी व्यावसायीक आहेत.

अनेकांचे गाळाभाडे थकलेले असले तरी बिनदिक्कतपणे व्यवसाय तेजीत सुरु आहेत, ग्रामपंचायतीच्या एकुण 18 लाखाच्या थकबाकीपैकी जवळपास 13 लाखाची थकबाकी या बड्या लोकांकडे आहे. यापैकी काल 17 थकबाकीदार न्यायालयात हजर झाले. यावेळी तडजोडीअंती 70 हजाराचा रोख वसुल झाला तर समान दोन हप्त्यात थकबाकी भरण्याची न्यायालयाने त्यांना मुदत दिली आहे.

ग्रामपंचायतीच्या घरपट्टी, पाणीपट्टी व गाळाभाडे या कराच्या थकबाकीचा आकडा मोठा आहे. केवळ राजकारणासाठी बड्यांना वेळोवेळी संरक्षण मिळत असल्याने वर्षानुवर्षे थकबाकीचा आकडा वाढत आहे. सामान्य नागरिकांना वारंवार ग्रामपंचायतीच्या दाखल्यांची आवश्यकता पडत असल्याने त्यांची थकबाकी नगण्यच आहे. त्यामुळे मुठभर लोकांकडे वाढलेली थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने निःपक्ष पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Related Stories

No stories found.