सत्ता परिवर्तन, नवनिर्वाचित सदस्यांची जबाबदारी वाढली

टाकळीभान ग्रामपंचायतीची निवडणूक पाण्याभोवती
सत्ता परिवर्तन, नवनिर्वाचित सदस्यांची जबाबदारी वाढली

टाकळीभान |वार्ताहर|Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील राजकियदृष्ट्या प्रतिष्ठेच्या टाकळीभान ग्रामपंचायतीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी गेल्या पाच वर्षांतील पाणी टंचाईच

सत्ताधारी गटावर रोष व्यक्त करीत सत्तेत ऐतिहासिक परिवर्तन केले. गेल्या 25 वर्षांत मतदार राजाने प्रथमच मोठा कौल दिला. परिवर्तन ज्या अपेक्षेने झाले त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांची पाण्याच्या नियोजनाची जबाबदारी वाढल्याने पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्य क्रमाने प्रयत्न करावे लागतील.

टाकळीभान ग्रामपंचायतीत गेली 10 वर्षे सलग नानासाहेब पवार यांची एकहाती सत्ता होती. पंचायत समितीचे सभापती पद सलग पाच वर्षे भुषविल्यानंतर पुन्हा पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाल्याने त्यापुढील सलग 10 वर्षे पवार सत्तेपासून दूर होते. 2010 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना राजकारणात संजीवनी मिळाली.

या निवडणुकीत पवारांनी 7 जागा पटकावून दाभाडे गटाशी समझोता करीत 3 सदस्य सोबतीला घेऊन सरपंचपद पदरात पाडून घेतले व दाभाडे गटाला उपसरपंचपद बहाल केले. त्यानंतर पवार यांचे राजकारण पुन्हा तळपू लागले व एकापाठोपाठ एक सत्ता त्यांना मिळत गेल्या. त्यांच्या स्नुषा जि. प. सदस्या झाल्या. पवारांना विखे - ससाणेंच्या आशिर्वादाने बाजार समितीचे प्रशासकिय सभापती पद मिळाले.

त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांना पुन्हा सभापती पदाची संधी मिळाली. 2015 ला झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीनंतरही पवार पुन्हा सभापती झाले. त्याच दरम्यान 2015 ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आ. मुरकुटे गटाशी निवडणूक समझोता करून पवारांनी पुन्हा सरपंचपद पदरात पाडून घेत एकहाती सत्ता ताब्यात घेतली होती.

मुरकुटे गटाला अडीच वर्षानंतर सरपंच पदाच्या दिलेल्या शब्दाचा त्यांना विसर पडला आणि शेवटच्या अडीच वर्षांत मुरकुटे गट त्यांच्यापासून दुरावला असला तरी पवारांनी मात्र पूर्ण पाच वर्षे एकहाती सत्ता हाकली.

सलग 10 वर्षे सत्ता ताब्यात असल्याने काही विकास कामे चांगल्या प्रकारे मार्गी लावली. मात्र नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात त्यांना सपशेल अपयश आले. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नागरीक पाण्यासाठी सतत टाहो फोडीत राहिले. शेजारच्या गावांमध्ये अपुरा पाणीसाठा असतानाही दररोज पाणीपुरवठा होत होता येथे मात्र तीन-चार दिवसांतून पाणीपुरवठा केला जात होता. वाड्या वस्त्या तर पाणीपुरवठ्यापासून वंचितच होत्या. घुमनदेव रोड, घोगरगाव रोड, वाडगाव रोड, बेलपिंपळगाव रोडला जलवाहिन्या टाकूनही वाड्या वस्त्यांचे नागरिक सातत्याने तहानलेलेच राहिले.

गेल्या दहा वर्षांत पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले असल्याने नागरिकांमध्ये सत्ताधारी गटाविरोधात प्रचंड रोष होता. मात्र उघड बोलण्याची हिंमत कोणी दाखवली नाही. नागरिकांच्या मनातील खदखद नुकत्याच झालेल्या 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाच्या स्वरुपात व्यक्त झाली. 10 वर्षांची सत्ता असलेल्या सत्ताधारी पवार गटाला पूर्णपणे झिडकारले. 17 सदस्यांपैकी पवारांचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग 1 मधील एका सदस्याच्या बाजूने मतदारांनी कौल देत मोठे परीवर्तन केले.

प्रभाग 6 हा दिवंगत भाऊसाहेब दाभाडे यांचा बालेकिल्ल्याला पवार यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र भारत भवार, विलास दाभाडे यांनी पवारांचे आक्रमण रोखल्याने या प्रभागातील त्यांचे पुत्रही पराभूत झाले. प्रभाग 5 हा पवार गटाचे रमेश धुमाळ यांचा हक्काचा मतदार संघ समजला जात होता. मात्र या प्रभागातही त्यांची मोठी धोबीपछाड झाली. प्रभाग 4 दोन्ही गटांनी मोठा प्रतिष्ठेचा केला होता. तेथेही मतदारांनी पवारांच्या विरोधी कल दिला.

प्रभाग 2 व 3 हा महाविकास आघाडीचे प्राबल्य असलेलेच प्रभाग असल्याने पवार गटाला पराभव स्विकारावा लागला. पवारांविरोधी स्थापन झालेल्या लोकसेवा महाविकास आघाडीच्या प्रमुखांनाही एवढ्या मोठ्या विजयाची अपेक्षा नसताना मतदारांनी मोठा कौल दिला. गेली दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करीत असलेले कान्होबा खंडागळे हे या परीवर्तनाचे खरे हिरो ठरले. निवडणुकीतील त्यांचा झंजावात मतदारांना भावला. महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी मांडलेले पाणी प्रश्नाचे भांडवल प्रभावी ठरले व निवडणूक पाणी प्रश्नाभोवतीच फिरत राहिली.

पाणी प्रश्नाच्या भांडवलावर लोकसेवा महाविकास आघाडीला 16-1 असे बहुमत मिळाले असले तरी नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची जबाबदारी वाढली आहे. पाणी प्रश्न सोडविण्याची अपेक्षा मतदारांनी मतपेटीत व्यक्त केली असल्याचे भान नवनिर्वाचित सदस्यांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्राधान्य क्रमाने पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवून नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न केले जावेत अन्यथा पुढील पाच वर्षांनंतर माफ करणार नाही हे लक्षात ठेवावे असेच मतदारांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालातून दाखवून दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com