
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
सरकारी जागेतील अतिक्रमणाच्या मुद्यावरुन श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचयतीच्या 10 सदस्यांवर जिल्हाधिकारी यांचे कोर्टात अपात्रतेची कारवाई झाली असून या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या अपिलाची चौकशी काल 10 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. विभागीय आयुक्त नाशिक यांनी अद्याप अंतिम निर्णय दिला नसल्याने या निर्णयाची प्रतिक्षा ‘त्या’ दहा सदस्यांसह नागरिकांना लागली आहे.
सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या मुद्यावरुन शिवसेना ज्येष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या कोर्टात दहा सदस्यांविरोधात जून 2021 मध्ये दाखल केलेल्या विवाद अर्जाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑगष्ट 2022 मध्ये निकाल देत या सर्व सदस्यांचे सदस्यपद रद्द केले होते. त्यानंतर सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या निकालाला आव्हान देत 2 सप्टेंबर रोजी अपिल दाखल केले होते.
विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांच्या निकालाला एक महिन्याची अंतरीम स्थगिती दिली होती. मात्र 7 ऑक्टोबरनंतर 4 नोहेंबर, 2 डिसेंबर, 6 जानेवारी अशी वेळोवेळी सुनावणी ठेवली होती. त्यामुळे तारीख पे तारीख सुरु असल्याची चर्चा सुरू होती. मात्र दि. 10 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.
या सुनावणीचे कामकाज होवुन सदस्यांच्या दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तिवाद कोर्टाने नोंदवून घेत या अपात्रतेच्या निकालाची चौकशी पूर्ण केली. या प्रकरणात सरपंच, उपसरपंच व 8 सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी दोषी धरुन सदस्यपदी रहाण्यास आपात्र ठरविले आहे. विभागीय आयुक्तांच्या कोर्टात आता याबाबतची चौकशी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम होणार की त्यात फेरबदल होणार याकडे आता सदस्यांसह व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील 17 सदस्य संख्या असलेली ही मोठी ग्रामपंचायत गणली जाते. मोठी लोकसंख्या असल्याने गावचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे ग्रामसुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. सुमारे दिड वर्षापासून 10 सदस्यांवर व त्यातही सरपंच व उपसरपंचही अपात्रतेच्या कारवाईचा सामना करीत असल्याने व एकाच वेळी 10 सदस्य अपात्र होण्याच्या भितीने निकालानंतर पेच निर्माण होणार आहे. तसेच ग्रामविकासाला खिळ बसणार आहे हे निश्चित.