टाकळीभान ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ दहा सदस्यांची विभागीय आयुक्तांकडे धाव

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ दहा सदस्यांची विभागीय आयुक्तांकडे धाव

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

सरकारी जागेतील अतिक्रमणाच्या मुद्यावरुन जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांचे सदस्यपद रद्द केले. या सर्व सदस्यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कोर्टात धाव घेत जिल्हाधिकारी यांच्या निकालाला आव्हान देत अपिल दाखल केले आहे.

श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील महत्वाच्या व राजकीय प्रतिष्ठेच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले असल्याने ग्रामपंचायत अधिनियमानुसार हे सदस्य अपात्र असून या सदस्यांचे सदस्यपद रद्द करावे, अशी मागणी ज्येेष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कोर्टात केली होती. या विवाद अर्जावर जिल्हाधिकारी यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी होऊन दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या सर्व 10 सदस्यांना सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरवत त्यांचे सदस्यपद रद्द करीत असल्याचा निकाल दिला.

सतरा सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या जानेवारी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 16 जागा जिंकल्या होत्या तर तत्कालीन सत्ताधारी गटाला केवळ 1 जागा जिंकता आली होती. सत्ता स्थापनेनंतर महाविकास आघाडीत बिघाडी होत गेल्याने थोड्याच दिवसात सरपंच व उपसरपंच असे दोन गट पडले. त्यामुळे सत्ताधारी गटात सुसंवाद राहीला नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला. अंतर्गत धुसफुसही मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने सरपंच गटाकडे 6 सदस्यांचे संख्याबळ राहिले होते. नुकतेच विरोधी गटाच्या एका सदस्याने मुरकुटे गटात प्रवेश केल्याने 7 झाले होते तर उपसरपंच गटाकडे 10 सदस्यांचे संख्याबळ होते. सरपंच गटाचे 4 सदस्य अपात्र झाल्याने या गटाकडे 3 सदस्य उरले आहेत तर उपसरपंच गटाचे 6 सदस्य अपात्र ठरल्याने 4 सदस्य उरले आहेत.

या दोन्ही गटांनी काल शुक्रवारी विभागीय आयुक्य, नाशिक यांच्या कोर्टात धाव घेवुन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सदस्यत्व रद्दच्या निर्णयाला आव्हान देत अपिल दाखल केले आहे. विवाद अर्जातील तक्रारदार राधाकृष्ण वाघुले यांनीही जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालावर कॅव्हेट दाखल केले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या निकालाकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com