टाकळीभान ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्या विरोधातील तक्रार अर्जाची जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी सुरू

टाकळीभान ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्या विरोधातील तक्रार अर्जाची जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी सुरू

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याने सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधकाम करून पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत येथील सामाजिक कार्यकर्ते बापू केरू शिंदे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे अर्ज दाखल करून त्या सदस्याच्या अपात्रतेची मागणी केली आहे.

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या गेल्या वर्षी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या विद्यमान दहा सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणावरून ग्रामपंचायत अधिनियमानुसार सदस्यपदावर राहता येत नसल्याने त्या सदस्यांना ग्रामपंचायतीचे कामकाज पाहण्यास व पदावर राहण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत चौकशी पूर्ण झाली असल्याने त्या दहा सदस्यांचा जीव टांगणीला लागलेला असतानाच आणखी एक सदस्य मयुर अशोक पटारे यांच्या अपात्रतेबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे बापू शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी सुरू झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित सदस्याला दि. 10 डिसेंबर 2021 रोजी नोटीस देऊन आठ दिवसांत शासकीय जागेवर केलेले आतिक्रमण काढून घेण्याचे आदेशही होते. मात्र कारवाई होत नसल्याने शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर सदस्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत आधिनियम 1966 चे कलम 14 (ज 3) व 16 अन्वये ग्रामपंचायतीचे कामकाज पाहण्यास व सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी केली आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तक्रार अर्जाची दखल घेत विद्यमान सदस्य मयुर अशोक पटारे यांना योग्य त्या कागदपत्रांसह सुनावणी कामी जिल्हाधिकारी यांच्या दालनात हजर राहणेकामी नोटीस बजावली आहे. यापुर्वीही विद्यमान 10 सदस्यांवर शासकीय जागेत आतिक्रमण करून राहत असल्याने अर्ज दाखल झाला होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून लवकरच जिल्हाधिकारी या अर्जावर निकाल जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली असतानाच पुन्हा आणखी एका सदस्याची चौकशी सुरू झाल्याने 11 सदस्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Related Stories

No stories found.