
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचयतीच्या 10 सदस्यांवर सरकारी जागेतील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अपात्रतेची कारवाई झाली असून या सदस्यांना विभागिय आयुक्तांकडून तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू आहे. आता 6 जानेवारी 2023 रोजी पुढील सुनावणी ठेवली असल्याने त्या सदस्यांना एक महिनाभर दिलासा मिळाला आहे.
सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या मुद्यावरून ज्येष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या कोर्टात दहा सदस्यांविरोधात दाखल केलेल्या विवाद अर्जाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निकाल देत या सर्व सदस्यांचे सदस्यपद रद्द केले आहे. या सर्व सदस्यांनी विभागिय आयुक्त, नाशिक यांच्या कोर्टात धाव घेत जिल्हाधिकारी यांच्या निकालाला आव्हान देत अपिल दाखल केले आहे.
विभागिय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांच्या निकालाला एक महिन्याची अंतरीम स्थगिती दिली होती. मात्र 7 आक्टोबर नंतर 4 नोहेंबर व त्यानंतर 2 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली होती. मात्र आता 6 जानेवारी ही सुनावणीची पुढील तारीख देण्यात आल्याने तारीख पे तारीख सुरू असल्याची चर्चा आहे.
जिल्हाधिकारी यांच्या निकालाला आव्हान देत या दहा सदस्यांंच्या दोन्ही गटांनी विभागिय आयुक्त यांच्या कोर्टात 2 सप्टेंबर 22 रोजी अपिल अर्ज दाखल केले आहेत. याबाबत दोन्ही गटांच्या वकिलांकडून तोंडी युक्तिवाद करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती मागण्यात आली होती. त्यानुसार विभागिय आयुक्तांनी 7 ऑक्टोबरपर्यंत सदस्यांच्या अपात्रतेच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती देऊन जैसे थे परीस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. कामकाज न झाल्याने सुनावणीची पुढील पुन्हा 4 नोव्हेंबर तारीख देण्यात आली होती. त्यानंतर 2 डिसेंबर तारीख होती. मात्र यावेळही पुढील 6 जानेवारी ही तारीख देण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी केवळ तारीख पे तारीख सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.