
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
गेल्या दीड वर्षांपासून प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ असलेली ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत. टाकळीभान (Takalibhan) ग्रामपंचायतीने (Grampanchayat) काल मंगळवार दि. 31 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेलाही (Gramsabha) पावसाने स्थगिती (Postponement) दिल्याने गेल्या आठ दिवसांपासून ग्रामसभेसाठी विविध प्रश्नांची रंगीत तालीम करीत असलेल्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
टाकळीभान ग्रामपंचायतीच्या (Takalibhan Grampanchayat) वतीने गेल्या दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर करोनाचे नियम पाळून 31 ऑगष्ट रोजी ग्रामसभा घेण्याचा निर्णय (Decision) घेतला होता. गेल्या सात महिन्यांपूर्वी सत्तेत आल्यानंतर केलेल्या विकास कामांना मंजुरी, पुढील कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला मंजुरी, विठ्ठल देवस्थान विश्वस्त मंडळ व देवस्थान जमिनीवरील कथीत कूळ याबाबत चर्चा, तसेच तंटामुक्त गाव अभियानात सहभाग घेण्यासाठी चर्चा व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. बर्याच मोठ्या कालखंडानंतर ग्रामसभा होणार असल्याने अनेकांनी ग्रामसभेत प्रश्नांची सरबत्ती करण्याची रंगीत तालीम केली होती.
विरोधकही सत्ताधार्यांना धारेवर धरण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून आक्रमक दिसत होते. विठ्ठल देवस्थानबाबत ठराव मांडला जाणार असल्याने विश्वस्त मंडळ व कथित कुळांचीही या ग्रामसभेतील ठरावाकडे नजर लागलेली होती. तर गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असलेल्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडी बाबतही इच्छुकांची संख्या वाढल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव वाढत होता. अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी दमदार फिल्डिंग लावण्यासाठी गेल्या चार पाच दिवसांपासून बैठकांचा सिलसिला सुरू होता. अध्यक्ष पदासाठी एकमत होत नसल्याने गुंता वाढत असल्याने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठीच तंटा ग्रामसभेत वाढण्याचेही संकेत मिळत होते.
काल मंगळवारी नियोजित वेळेत पावसामुळे ठिकाण बदलून ग्रामसभा सुरू करण्याची तयारी ग्रामविकास अधिकारी आर.एफ जाधव यांनी केली होती. मात्र सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा वेग वाढत गेल्याने ग्रामसचिवालयापुढील मोकळ्या जागेत ग्रामसभा घेण्यास अडचण आली होती. कोव्हीड 19 च्या नियमानुसार बंदिस्त जागेत ग्रामसभा घेणे उचित नसल्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा करून अमर्याद कालावधीसाठी ही सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र ग्रामसभा स्थगित झाल्याने रंगीत तालीम करणारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून निर्बंध वाढवण्याबाबत चर्चा सध्या सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोणत्याहीक्षणी निर्बंध वाढवले जाऊ शकतात. शासनाकडून असे निर्बंध लावले गेले तर ग्रामसभा घेण्यासही अडचण येणार असल्याने पावसामुळे स्थगित झालेली ग्रामसभा अमर्याद कालावधीसाठी स्थगित राहिल्यास अनेकांना आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वाट पाहावी लागणार आहे.