टाकळीभान |वार्ताहर|Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे

खंदे समर्थक माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या गटाचा सपशेल सफाया करीत लोकसेवा महाविकास आघाडीने 10 वर्षानंतर सत्ताधार्यांवर संक्रांत आणुन सत्ता परिवर्तन केले. महाविकास आघाडीने 17 पैकी 16 जागा जिंकुन ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

गेली 10 वर्षे या ग्रामपंचायतीवर माजी सभापती नानासाहेब पवार यांचा एकछत्री अंमल होता. कामकाजात सदस्य मंडळापेक्षा पवार यांचाच निर्णय महत्वाचा मानला जात होता. त्यामुळे ग्रामविकासाचे निर्णय ग्रामपंचायतीच्या सभागृहात होण्यापेक्षा मातोश्री वरुनच होत होते. पवार यांनी काही विकास कामे केली असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात त्यांना गेली 10 वर्षे अपयश आले आणि अखेर निवडणूक पिण्याच्या पाण्याभोवती फिरत राहिली.

ही निवडणूक भाजपा विरुध्द लोकसेवा महाविकास आघाडी दरम्यान लढवली गेली. भाजपाच्या गटाचे नेतृत्व माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक नानासाहेब पवार करीत होते तर खा.लोखंडे, माजी आ. भानुदास मुरकुटे, आ. कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे व अविनाश आदिक यांच्या लोकसेवा महाविकास आघाडीचे नेतृत्व मंजाबापु थोरात, ज्ञानदेव साळुंके, कान्हा खंडागळे, शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब कोकणे, अॅड. सर्जेराव कापसे, विष्णुपंत खंडागळे, भारत भवार हे करीत होते.

प्रभाग 1 मधुन महाविकास आघाडीचे सविता पोपट बनकर (758), छाया योव्हान रणनवरे (743) तर ग्रामविकास मंडळाचे दिपक शंकर पवार (732) मते मिळवुन विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे विलास बाळासाहेब सपकळ (684), ग्रामविकास मंडळाचे सुवर्णा अविनाश लोखंडे (655), देविका एकनाथ रणनवरे (647) पराभुत झाले. ग्रामविकास मंडळाला या प्रभागातील केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

प्रभाग 2 मधुन महाविकास आघाडीचे सुनिल तुकाराम बोडखे (575), लता भाऊसाहेब पटारे (577), अशोक लालचंद कचे (686) मते पडुन विजयी झाले तर ग्रामविकास मंडळाचे नारायण हरीभाऊ काळे (486), माया नवनाथ पटारे (479), वर्षा किशोर गाढे (354) मते मिळवुन पराभुत झाले. प्रभाग 3 मधुन महाविकास आघाडीचे युवा नेते कान्होबा खंडागळे (411), अर्चना शिवाजी पवार ( 365) मते मिळवुन विजयी झाले तर ग्रामविकासचे दिलीप धोंडीराम पवार (127), राजश्री राजेंद्र माने (173) मते मिळाल्याने पराभुत झाले.

प्रभाग 4 कडे दोन तरुण कार्यकर्त्यांमध्ये निकराची झुंज लढली गेली. महाविकास आघाडीचे मयुर अशोकराव पटारे (673), कल्पना जयकर मगर (687), अर्चना यशवंत रणनवरे (720) विजयी झाले तर ग्रामविकासचे राहुल अप्पासाहेब पटारे (548), स्वाती विकास मगर (532), सिमा गणेश साळवे (494) पराभुत झाले. प्रभाग 5 मध्ये महाविकास आघाडीचे दिपाली सचिन खंडागळे (693), सुनिल बापुराव ञिभुवन (501), कालिंदा बाबासाहेब गायकवाड (618) मते मिळवुन विजयी झाले तर ग्रामविकासचे राणी दिपक बोडखे (243), साखरबाई नंदु गायकवाड (308), आनंदा अशोक रणनवरे (285) तर अपक्ष शरद कमलाकर रणनवरे (162) मते मिळाल्याने पराभुत झाले.

प्रभाग 6 मध्ये प्रतिष्ठेच्या लढतीत महाविकास आघाडीचे अशोकचे संचालक दत्ताञय कुंडलीक नाईक (559), गोरख अण्णासाहेब दाभाडे (609), कविता मोहन रणनवरे (651) मते मिळवुन विजयी झाले तर ग्रामविकासचे माजी सभापती नानासाहेब पवार यांचे पुत्र भाऊसाहेब नानासाहेब पवार (431), अनिल दत्तात्रय दाभाडे (541), आशा गणेश रणनवरे (487) तर अपक्ष सोमनाथ रामदास पाबळे (175) यांना पराभवाचा सामना करावा लागला.

या निवडणुकीत माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दिला तरुण मतदारांनी सुरुंग लावला. त्यात त्यांचे पुत्र भाऊसाहेब पवार, राहुल पटारे, नारायण काळे, सुवर्णा अविनाश लोखंडे या युवा नेतृत्वाला पराभव चाखावा लागला. मतदारांनी कान्होबा खंडागळे व युवा नेतृत्व मयुर पटारे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत महाविकास आघाडीकडे सत्ता सुपुर्द केली. विजयानंतर सर्वच प्रभागात विजयी उमेदवारांनी आभार फेरी मारुन मतदारांचे आभार मानले.

नोटाचा प्रभाव वाढला

काल झालेल्या मतमोजणीत नोटाने चांगलाच भाव खाल्ला. सर्वाधीक नोटाचा प्रभाव प्रभाग 1 मध्ये (81) दिसुन आला. प्रभाग 2 मध्ये (56), प्रभाग 3 मध्ये (6), प्रभाग 4 मध्ये (60), प्रभाग 5 मध्ये (46), प्रभाग 6 मध्ये (54) मते नोटाला पडली. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत नोटाचा प्रभाव वाढलेला दिसून आला.