‘त्या’ सदस्यांंची उद्या विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या अपात्रतेची कारवाई
‘त्या’ सदस्यांंची उद्या विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

सरकारी जागेत अतिक्रमण केले असल्याच्या मुद्यावरुन जिल्हाधिकार्‍यांनी टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांचे सदस्यपद रद्द केल्याने या सर्व सदस्यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कोर्टात धाव घेत जिल्हाधिकारी यांच्या निकालाला आव्हान दिलेले असून त्याची उद्या दि. 4 नोहेंबर रोजी सुनावणी असल्याने ग्रामस्थांच्या नजरा उद्याच्या सुनावणीकडे लागल्या आहेत.

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील महत्वाच्या व राजकीय प्रतिष्ठेच्या 17 सदस्य संख्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले असल्याने ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार हे सदस्य अपात्र असल्याने या सदस्यांचे सदस्यपद रद्द करावे, अशी मागणी ज्येष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कोर्टात केली होती. या विवाद अर्जावर जिल्हाधिकारी यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी होवुन नुकताच दि. 30 ऑगष्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या सर्व 10 सदस्यांना सदस्य पदावर रहाण्यास आपात्र ठरवत त्यांचे सदस्यपद रद्द करीत असल्याचा निकाल दिला होता.

जिल्हाधिकारी यांच्या निकालाला आव्हान देत या दहा सदस्यांंच्या दोन्ही गटांनी विभागीय आयुक्त यांच्या कोर्टात दि. 2 सप्टेबर 22 रोजी अपिल अर्ज दाखल केले आहेत. याबाबत दोन्ही गटांच्या वकिलांकडुन तोंडी युक्तिवाद करण्यात येवुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती मागण्यात आली होती. त्यानुसार विभागिय आयुक्तांनी दि. 7 ऑक्टोबरपर्यंत सदस्यांच्या अपात्रतेच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती देवुन जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र दि. 7 ऑक्टोबर रोजी सुनावणीचे कामकाज न झाल्याने सुनावणीची पुढील तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या दि. 4 नोहेंबर रोजी ही सुनावणी होत असून ग्रामस्थांच्या नजरा या सुनावणीकडे लागल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com