टाकळीभान |वार्ताहर|Takalibhan

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील महत्त्वाच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीची निवडणुकीतील चुरस अंतिम टप्प्यात वाढली आहे.

मतदारांना प्रत्येक प्रभागात जेवणावळी देऊन खुश करण्याचा प्रयत्न दोन्ही मंडळांनी मनसोक्तपणे केल्याने खवैय्यांची धमाल झाली आहे. आज होणार्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

टाकळीभान ग्रामपंचायतीची निवडणूक गाजणार असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते. तरुणांनी यंदा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उडी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. गेल्या दहा बारा दिवसांपासून उमेदवारांची चांगलीच उधळपट्टी सुरू आहे. यावर्षी प्रथमच प्रत्येक प्रभागात दोन्ही गटाकडून रंगीतसंगीत पार्ट्या उठवल्या गेल्याने खवैय्यांची धमाल झाली आहे.

मतदारांना आकर्षीत करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या शकली लढवत आहेत. पाण्यासाठी उमेदवारांनी गेले दहा बारा दिवस चांगलीच धावाधाव केली. तरुण असलेल्या उमेदवारांनी आपापले प्रभाग चांगलेच पिंजून काढले आहेत. देवदर्शन न करणारे अनेक तरुण उमेदवार पटापटा मतदारांचे घरात, रस्त्यावर, शेतात, दिसेल तेथे दर्शन घेताना दिसून आले.

मतदार मात्र हसत हसत दोन्ही गटाच्या उमेदवारांना आशिर्वाद देताना दिसत होते. उमेदवारांचे तरुण कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यस्त दिसत होते. त्यामुळे निवडणुकीची रंगत भरली होती. प्रचार नारळ शुभारंभ व सांगता सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने अंतिम टप्प्यात वातावरण चांगलेच गरम झालेले दिसून येते.

आज होणार्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 7 हजार 542 मतदारांसाठी 11 बुथ तयार करण्यात आले आहेत. प्रभाग 1,2,3,4 साठी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत 7 बुथ तर प्रभाग 5 व 6 साठी न्यू इंग्लिश स्कुलमध्ये 4 बुथ उभारण्यात आले आहेत. एकूण 55 कर्मचारी मतदानासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता श्रीरंग गडधे हे काम पहात आहेत तर ग्रामविकास आधिकारी रामदास जाधव, कामगार तलाठी अरुण हिवाळे, सहाय्यक संदीप जाधव, कोतवाल सदाशिव रणनवरे हे त्यांना सहकार्य करीत आहेत. मतदान काळात शांततेत मतदान प्रक्रीया पार पडावी म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. मसुद खान यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.