टाकळीभान-घोगरगाव रस्त्याच्या अतिक्रमणाचा मुद्या पुन्हा ऐरणीवर

शिंदे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
टाकळीभान-घोगरगाव रस्त्याच्या अतिक्रमणाचा मुद्या पुन्हा ऐरणीवर

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान-घोगरगाव या मुख्य रहदारीच्या मार्गाला अतिक्रमणाने वेढले असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊन

रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटविण्याची विनंती केलेली आहे. त्यासंदर्भात लवकरच योग्य ती कारवाई करून अतिक्रमण हटविले जाईल. असे लेखी पत्र संबंधित खात्याने दिलेले असताना आजपर्यंत हे अतिक्रमण काढले गेले नाही. तरी लवकरात लवकर या रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवून रस्त्याचा कोंडलेला श्वास मोकळा करावा. अन्यथा 3 डिसेंबर रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बापू केरू शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

टाकळीभान येथे कमानीतून घोगरगावकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी अनधिकृत अतिक्रमण करून रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत व्यवसाय थाटले आहेत. रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडी हा नित्याचा विषय झाला आहे. छोट्या मोठ्या अपघाताचेही प्रमाण त्यामुळे वाढले आहे. सदर अतिक्रमण काढण्याबाबत शिंदे यांनी दि. 29 एप्रिल 2020 व 4 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनीक बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले होते.

त्यानुसार सार्वजनिक बांधकामने अतिक्रमणधारकांना दोन नोटिसा देऊन ठराविक कालावधीत अतिक्रमण काढण्यास सांगीतले होते. दिलेल्या कालावधीत स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास संबंधित विभागाकडून अतिक्रमण हटविले जाईल, असा स्पष्ट उल्लेख नोटीसमध्ये केलेला होता. मात्र कारवाई झाली नाही. तदनंतर अतिक्रमणधारकांना तिसरी नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण काढले जाईल. या स्वरूपाचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने शिंदे यांना दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सध्या साखर कारखाने सुरू झाले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. त्याचबरोबर याच घोगरगाव रोडलगत व्यावसायिकांनी अजूनच अतिक्रमण केले आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रक, डबल ट्रॉलीचे ट्र्ॅक्टर, जुगाड यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र हे अतिक्रमण हटविण्याचा विसर पडलेला दिसत आहे.

तरी सार्वजनीक बांधकाम विभागाने लवकरात लवकर तिसरी नोटीस देऊन सदर अतिक्रमण हटवावे, अन्यथा 3 डिसेंबर 2020 रोजी टाकळीभान येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग करून आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com