
टाकळीभान (वार्ताहर)
टाकळीभान परीसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापुस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बळीराजाला मोठा आर्थिक भुर्दंड बसल्याने पंचनामे करुन भरपाई देण्याचे आदेश सरकारने दिले.
माञ पंचनामे सुरु असतानाच जिरवा जिरवीच्या राजकारणाचा कामगार तलाठ्याला फटका बसल्याने पंचनाम्याचे काम थांबल्याने अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यात बळीराजाचीच जिरली गेली. अनेक पात्र लाभार्थी आनुदानापासुन वंचित राहीले आहेत.
गेल्या खरीप हंगामात सप्टेंबर व आक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापुस, मका, फळबाग व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके वाया गेल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शासनाने सरसकट नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार येथील कामगार तलाठी यांनी नुकसानीची पहाणी करुन पंचनामे सुरु करुन याद्या तयार करण्याचे काम सुरु केले होते.
कामगार तलाठी यांनी 1035 बाधीत शेतकर्यांच्या सोयाबीन व काही बाधीत क्षेत्रावरील कपाशी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले होते. त्यापैकी सुमारे 780 शेतकर्यांची यादी अपडेट झाली होती. मात्र राजकिय जिरवा जिरवीत काही तरुण कार्यकर्ते व कामगार तलाठी यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने कामगार तलाठी यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
मात्र त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई संदर्भातील पुढील कामकाज ठप्प झाले. त्यामुळे पंचनामा झालेले 255 शेतकरी व संभाव्य नुकसान झालेले अधिकचे शेतकरी वंचित राहीले आहेत.
महसुल विभागाकडुन नुकत्याच पहाण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या यादीत केवळ 780 शेतकर्यांना जिरायत पिकासाठीची हेक्टरी 13 हजार 600 रुपयाप्रमाणे भरपाई मिळाली आहे. या दरानुसार एका गुंठ्यासाठी फक्त 136 रुपये भरपाईचा लाभ मिळणार आहे. वास्तविक टाकळीभान हे संपुर्ण बागायत क्षेत्र असल्याने हेक्टरी रुपये 27 हजाराप्रमाणे भरपाई मिळणे अपेक्षित होते.
त्यातच प्रभारी आलेल्या कामगार तलाठी यांनी नुकसान भरपाईसाठीची उर्वरीत बाधित शेतकर्यांचा यादीत समावेश करुन महसुल विभागाकडे दाखल करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने येथील बळीराजाला हेक्टरी भरपाईसह वांचित राहीलेल्या शेतकर्यांना शासनाच्या नुकसान भरपाई मिळण्याचा चांगलाच फटका बसला. जिरवा जीरवीच्या राजकारणात अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्यात बळीराजाचीच जिरली गेली, अशी चर्चा आहे.