टाकळीभान परिसराला शेतकरी प्रोत्साहन योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

लाभार्थी आधार प्रमाणीकरण दुसरी यादी कधी?
टाकळीभान परिसराला शेतकरी प्रोत्साहन योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना सरकारने जाहीर केलेली शेतकरी प्रोत्साहन लाभ योजना सुमारे दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी रखडली होती. गेल्या महिन्यात काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन सरकारने उर्वरीत लाभार्थ्यांची प्रतीक्षा वाढविली असल्याने दुसरी यादी कधी येणार? याकडे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर 2019 मध्ये या सरकारने शेतकर्‍यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना लागू केली होती.या योजनेत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले होते. मात्र संपूर्ण थकित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देऊनही प्रोत्साहन लाभ योजना रखडली होती. महाविकास आघाडी सरकारने दोन तीन वेळा नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांची माहिती संकलीत केली होती.

गेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूदही केली होती. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. त्यानंतर सत्तारुढ झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेला महत्त्व देत पुर्वीची माहिती रद्द करून निकषांसह पुन्हा माहिती (डेटा) संकलीत केली. त्यामुळे प्रोत्साहन योजनेचा लाभ कधी मिळणार, याची नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रतीक्षा लागून राहिली होती.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या महिन्यात या योजनेचा मुहूर्त साधला. श्रीरामपूर तालुक्यात नव्या माहितीनुसार 2 हजार 627 लाभार्थी लाभासाठी पात्र ठरले आहेत. सरकारकडून या पात्रा लाभार्थींपैकी फक्त 230 लाभार्थींची पहिली यादी प्रसिध्द करून या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून त्यांना दिवाळीपूर्वी लाभ दिला. श्रीरामपूर तालुक्यात अद्याप सुमारे 2 हजार 400 लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. तालुक्यातील टाकळीभान येथे टाकळीभान वि.का.सो.चे 88, संत सावता माळी वि.का.सो.चे 23 तर बिग बागायतदार वि.का.सो.चे 27 असे 138 पात्र लाभार्थी आहेत. यापैकी टाकळीभान वि.का.सो.च्या 4 तर संत सावता माळी वि.का.सो. च्या 3 लाभार्थ्यांचा पहिल्या यादीत सामावेश होऊन योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे येथील सहकारी सोसायट्यांचे सुमारे 131 लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत असल्याने दिवाळीपूर्वी या योजनेचा लाभ मिळून दिवाळी आनंदात जाईल, अशी शेतकर्‍यांनी आशा बाळगली होती. मात्र सरकारने टिचभर यादी पाठवून हातभर यादीतील शेतकर्‍यांची मोठी निराशा केली. दिवाळी अंधारात गेली असली तरी खरिपाचे पीक गेल्याने आता रब्बीच्या पिकांच्या उभारणीला तरी लाभ मिळावा, यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या नजरा सरकारच्या आदेशाकडे लागल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दुसरी यादी जाहीर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com