टाकळीभान गावठाण हद्दवाढीबाबत शिष्टमंडळाचे मंत्री विखेंना साकडे

प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे ना. विखे यांचे आश्वासन
टाकळीभान गावठाण हद्दवाढीबाबत शिष्टमंडळाचे मंत्री विखेंना साकडे

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील टाकळीभान गावच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुर्वीचे गावठाण अपुरे पडत असल्याने गावठाण लगतच्या सरकारी जागेत नागरिकांचे अतिक्रमण होत आहे. या सरकारी जागा गावठाण हद्दीत सामाविष्ट करून हद्दवाढ करावी, अशी मागणी माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन केली. तातडीने सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी ना. विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.

काल रविवारी लोणी येथील जनसेवा संपर्क कार्यालयात विखे यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. टाकळीभान येथील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत टाकळीभान व परिसरातील विविध समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी ना. विखे पाटील यांनी समस्यांबाबत ताबडतोब संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या व लवकरात लवकर सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात सेवा संस्थेचे माजी चेअरमन राहुल पटारे, मधुकर कोकणे, माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश लोखंडे, सुधीर मगर, किशोर गाढे आदींचा सहभाग होता.

टाकळीभानच्या वाढत्या लोकसंख्येमुळे गावाची हद्दवाढ करावी. लोकसंख्येने 25 हजारचा टप्पा ओलांडल्याने गावठाण अपुरे पडत आहे. कुटुंबांना अपुर्‍या जागेमुळे व सर्व जागा शासकीय असल्याने जन सुविधा मिळण्यास अडचणी येत आहेत.मूळ गावठाणलगत सर्व सरकारी गट नंबर आहेत. त्यामुळे सरकारी जागेत मोठे आतिक्रमण झाले आहे. गावठाण हद्दवाढ झाल्यास, अतिक्रमण नियमानुकुल होऊन अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या 400 पेक्षा जास्त घरकुलांचा प्रश्न मार्गी लागून लाभार्थ्यांना राहत्या जागेवरच घरकुलाचा लाभ मिळणार आहे. येथील गट नं. 32, 189, 245, 246, 247, 252 ,250 ,256 ,246, 287 ,189 मधील अतिक्रमण क्षेत्र गावठाणमध्ये वर्ग करण्याची व या कुटुंबाची सिटी सर्वेला नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली.

येथील आदिवासी व मागासवर्गीय शेतकर्‍यांना सन 1975 साली प्रत्येकी 5 एकर प्रमाणे सरकारने जमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या. कालांतराने संगणकीय उतारा प्रणालीमुळे या शेतकर्‍यांच्या पीक पाहणी उतार्‍यावर नावे येत नाही. या शेतकर्‍यांची कब्जेदार सदरी नावे लावण्यात यावी, अतिक्रमण नियमित करून त्यांना हक्काचे उतारे देण्यात यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

तसेच परीसरातील खेड्यांना दळणवळणासाठी जोडणार्‍या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने टाकळीभान ते कारेगाव तीन किलोमीटर, टाकळीभान ते वांगी तीन किलोमीटर, बेलपिंपळगाव एक किलोमीटरपर्यंत रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत तसेच टाकळीभान ते खिर्डी, गुजरवाडी, पाचेगाव, भेर्डापूर, वांगी, पाथरे इत्यादी गावाला जोडणार्‍या रस्त्यावर जलसंपदाच्या कालव्यावरील पुलाला मोठे भगदाड पडल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. त्या पुलाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी केली असता तत्काळ जलसंपदाच्या संबंधित अधिकार्‍यांना फोनवरून काम सुरू करण्याचे आदेश ना. विखे यांनी दिले.

यावेळी चंद्रकांत थोरात, बाळासाहेब लोखंडे, सदा रणनवरे, रावसाहेब गांगुर्डे, दादासाहेब गाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने ना. विखेपाटलांचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com