
टाकळीभान (वार्ताहर)
चोरट्यांनी चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू चोरण्याचा फंडा सुरु केला आहे. काल शनिवारी रात्री टाकळीभान येथे चोरट्यांनी बसस्थानक परीसरातील व्यवसायिकांनी चोरांची बत्ती गुल होण्यासाठी दुकानाबाहेर लावलेल्या चार दुकानासमोरील सीसी टीव्ही कॅमेर्यावरच डल्ला मारल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची व या नव्या फंड्याची जोरदार चर्चा होत आहे.
येथील बसस्थानक परीसरातील व पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या श्रीरामपूर नेवासा रोड लगतच्या औषधाचे दुकान, दोन नाष्टा हाटेल व एका कृषी सेवा केंद्रासमोर लावलेल्या सीसी टीव्ही कॅमेर्यांवर शनिवारी रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांंनी थेट कमेरेच चोरल्याची घटना घडली. बसस्थानक परीसरात श्रीरामपूर नेवासा रोडलगत ग्रामपंचायतीच्या शिवपार्वती शापिंग सेंटरमध्ये संदिप टुपके यांचे औषधाचे दुकान आहे.
चोरट्याने दुकानाबाहेर लावलेला सीसी टीव्ही कॅमेरा चोरला, येथुनच 30 फुटाच्या अंतरावर असलेल्या राजु गायकवाड यांच्या हाटेल न्यु सावता या नाष्टा सेंटरच्या बाहेर लावलेला सुमारे साडे बारा हजार रुपये किंमतीचा एक कॅमेरा चोरला. त्यानंतर शेजारील विलास नवले यांच्या हाटेल सावता या नाष्टा सेंटरचे 10 हजार रुपये किंमतीचे चार कॅमेरे चोरले. त्यानंतर याच शापिंग सेंटरमधील रणजित धुमाळ यांच्या शेतकी कृषी सेवा केंद्राबाहेर लावलेल्या कॅमेर्यावरही डल्ला मारला. चोरट्यांनी सुमारे 25 हजार रुपये किंमतीचे सहा कॅमेरे चोरून नेलेे. चोरटा यावेळी कॅमेर्यात कैदही झाला आहे.
गावासह परिसरात भुरट्या चोरीच्या प्रमाणात सध्या वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपुर्वी येथील इंदिरानगर परीसरातील बाळासाहेब सपकळ यांच्या घराजवळ बांधलेल्या गावरान गायी चोरीचा प्रयत्न झाला होता. मा्र गायीकडुन प्रतिकार झाल्याने हातातील दोरी, खुंटी सोडुन चोरटे पळुन गेल्याने चोरट्यांचा मुद्देमाल सापडला आहे.
वारंवार भुरट्या चोर्या होत असल्या तरी तपास लागत नसल्याने भुरट्या चोरांचे मनोबल वाढून वेगवेगळ्या वस्तू चोरण्याचा फंडा चोरांकडुन वापरला जात असल्याचे दिसुन येत आहे. चोरीची घटना होवु नये यासाठी सीसी टीव्ही कॅमेर्यांचे सरक्षक कवच वापरले जाऊ लागले आहे. मात्र आता चोरट्यांनी सीसी टीव्ही कॅमेरे चोरण्याचाच फंडा सुरु केल्याने या घटनेची गावात चर्चा सुरु आहे.