
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
राज्य मार्गाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली ग्रामपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी संयुक्त कारवाई करत राज्य मार्गालगत बांधलेले बस स्टँण्ड जमिनदोस्त केले. मात्र आता नवीन बांधकामासाठी आ.लहु कानडे यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर होऊनही गावपुढार्यांच्या टोलवाटोलवीत बांधकाम रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बांधकामासाठी जागा मिळावी म्हणून चकरा मारीत आहेत तर ग्रामपंचायत सदस्य लपाछपीचा खेळ खेळत बांधकामाला खोडा घालीत आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. शेजारील 10 ते 15 खेड्यांची बाजारपेठ असल्याने नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरुन जाणार्या सर्वच जलद व अतिजलद बसला येथे थांबा असल्याने जवळपासच्या गावातील प्रवासीही एस. टी. ने प्रवास करण्यासाठी येथेच येतात. दररोज सुमारे 450 ते 500 विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करीत असतात. प्रवासी संख्येमुळे सुमारे 35 ते 40 वर्षापूर्वी 40 फुट लांबीचे उपहार गृहासह एस. टी. स्टँण्ड बांधण्यात आले होते. गेल्या दिड वर्षापूर्वी राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु झाल्याने अडथळा ठरत नसतानाही ग्रामपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत एस. टी. स्टँण्ड जमिनदोस्त केले होते.
एस. टी. स्टँण्ड पाडल्याने शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक ऊन, वारे झेलत राज्य मार्गावर तिष्ठत उभे राहून एस टी. ची प्रतिक्षा करीत आहेत. सर्व पक्षाच्या गावपुढार्यांना याबाबत माहिती असूनही सगळेच मुग गिळून गप्प बसले आहेत. एरव्ही विकास कामाच्या निकृष्ठ दर्जाबद्दल आरडाओरड करणारे तरुणही या महत्वाच्या प्रश्नावर आंदोलनाच हत्यार का उचलत नाहीत? जुन्या बस स्टॅण्डच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी कोण आडकाठी घालत आहे. याबाबतही खुलासा होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायतीच्या सत्ताधार्यांनी याबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये उद्रेक झाल्याशिवाय रहाणार नाही ही वस्तुस्थिती आहे.
राज्य मार्गावरील इतर ठिकाणचे बस स्टँण्ड रुंदीकरणात अडथळा ठरणारे असल्याने तेही पाडण्यात आले होते. मात्र आ. लहु कानडे यांनी प्रवाशांची गरज ओळखून राज्य मार्गावरील या सर्व बस स्टँण्डसाठी निधी उपलब्ध करुन दिला होता. राज्य मार्गावरील सर्व ठिकाणचे नवीन बस स्टँण्ड बांधून पूर्ण झाले आहेत. मात्र गावपुढार्यांच्या टोलवाटोलवीत टाकळीभानच्या बस स्टँण्डचा निधी अद्याप अखर्चित आहे.