टाकळीभान गटातील लोकसेवा मंडळाच्या उमेदवारांचा प्रचाराचा फुटला नारळ

अशोक कारखाना निवडणूक
टाकळीभान गटातील लोकसेवा मंडळाच्या उमेदवारांचा प्रचाराचा फुटला नारळ

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

येत्या 16 जानेवारीला होणार्‍या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा मंडळाच्या टाकळीभान गटातील उमेदवारांचा प्रचाराचा नारळ काल सोमवारी येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात झाला. अध्यक्षस्थानी दत्तात्रय मगर होते.

यावेळी टाकळीभान लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, भास्करराव मुरकुटे, दत्तात्रय नाईक, उपसरपंच कान्हा खंडागळे, मयुर पटारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

अशोक सहकारी साखर कारखान्याची उमेदवारी अर्ज माघारीची आज मंगळवार दि. 4 जानेवारी आंतिम मुदत असली तरी टाकळीभान गटातील माजी आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा मंडळाचे उमेदवार अंतिम झाल्याने काल सोमवारी या गटातील उमेदवारांनी येथील शंभू महादेवाला नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. या गटात टाकळीभान, भोकर, बेलपिंपळगाव, घोगरगाव, कमालपूर व घुमनदेव ही सहा गावे येतात.

टाकळीभान येथील अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके यांच्या पत्नी हिराबाई यांना महिला मतदार संघातून, टाकळीभानच्या सरपंचपती यशवंत रणनवरे यांना अनु. जाती मतदार संघातून, भोकरचे विद्यमान संचालक पुंजाहरी शिंदे यांना इतर मागास प्रवर्गातून, सर्वसाधारण मतदार संघातून स्वतः भानुदास मुरकुटे, घोगरगाव येथून ज्ञानदेव पटारे यांची उमेदवारी अंतिम झाल्याने माघारीची वाट न पाहता या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी दिगंबर बारस्कर, अमोल कोकणे, सकाहरी शिंदे, लहानभाऊ नाईक, भारत भवार, विलास दाभाडे, भाऊसाहेब नानासाहेब कोकणे, रामकृष्ण मैड, दत्तात्रय साळुंके, भाऊसाहेब मगर, भाऊसाहेब बाबुराव कोकणे, अशोक पटारे, रामभाऊ नाईक, सुनील बोडखे, रंगनाथ पवार, रामदास नाईक, विकास मगर, लक्ष्मण सटाले, बाळासाहेब आहेर, गोटीराम दाभाडे, ठकसेन खंडागळे, भैरु कांगुणे, रावसाहेब शिंदे आदींसह टाकळीभान गटातील उमेदवार, त्यांचे समर्थक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार शुभारंभाप्रसंगी लोकसेवा महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच मंजाबापू थोरात व अशोक कारखान्याचे विद्यमान संचालक बापूराव त्रिभूवन हे अनुपस्थित असल्याने उपस्थितांमध्ये हा विषय चर्चेचा ठरत आहे. मंजाबापू थोरात यांनी टाकळीभान गटातून सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ते या गटातून सर्वसाधारणमधून निवडणूक लढवण्यास गेल्या काही वर्षांपासून इच्छुक होते. मात्र त्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने तसेच विद्यमान संचालक बापूराव त्रिभुवन यांनाही यावेळेस डावलण्यात आल्याने ते नाराज झाल्याने त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे. थोरात व त्रिभुवन दोघेही नाराज असले तरी या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल, हे पाहावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com