तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले

इनाम जमीन परस्पर विक्री करणार्‍यांवर कारवाई करणार
तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले

राहाता |वार्ताहर| Rahata

इनाम जमीन परस्पर विक्री करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन आदिवासी महिलांचे सुरू असलेले उपोषण नायब तहसीलदार यांच्याहस्ते सोडविण्यात आले.

राहाता येथील सर्वे नंबर 118/5 इनाम जमिनीची परस्पर नोटरी करून विक्री करणार्‍या नागरिकांवर कारवाई व्हावी जमिनीची खाते फोड, वारस नोंद करून मिळावी तसेच रक्तातील नात्यांच्या व्यक्तींनी नोटरी करून परस्पर गुंठे विकले त्याठिकाणी गुंठे खरेदी केलेल्या नागरिकांनी वाळू, खडी, पोल आणून अतिक्रमण केले. तसेच अनधिकृत जमिनीतील वृक्षतोड करणार्‍या नागरिकांवर वन विभागाच्या कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी या मागणीसाठी राहाता तलाठी कार्यालयासमोर मैनाबाई पवार, सरस्वती बर्डे, हिराबाई मोरे या तीन आदिवासी महिलांनी शनिवारी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता.

आदिवासी समाज नेते सुकदेव गायकवाड व विमल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना न्याय मिळावा यासाठी आदिवासी समाज बांधवांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला होता. सोमवारी 27 डिसेंबर रोजी उपोषणास बसलेल्या महिलांची दखल घेऊन तहसीलदार कुंदन हिरे यांनी नायब तहसीलदार भांगरे, तलाठी शिरोळे तसेच नगरपरिषदेत कार्यालयीन अधीक्षक नवनाथ जगताप व टाऊन प्लॅनिंगचे हसे यांना उपोषणास बसलेल्या महिलांची भेट घेऊन त्यांच्याकडून जमिनी बाबतची माहिती घेण्यास सांगून त्यांना नाय मिळेल अशी योग्य भूमिका घेण्याबाबत सूचना केल्या होत्या.

नायब तहसीलदार भांगरे व नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी उपोषणास बसलेल्या महिलांचे मागण्यांचे म्हणणे ऐकून इनाम जमीन परस्पर विक्री करणार्‍या व्यक्तींची चौकशी वारस नोंद, खातेफोड जमीनीवर केलेले अतिक्रमण तसेच बेकायदेशीर केलेली वृक्षतोड या सर्व गोष्टींची माहिती घेऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नायब तहसीलदार यांच्या हस्ते महिलांनी लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडवले.

यावेळी अ‍ॅड. सुनील सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष रामनाथ सदाफळ, जावेद शेख, राजू पवार, रोहित पवार, साई गायकवाड, रामदास निकम, विष्णू बर्डे, बाळासाहेब मोरे, सचिन बनकर, लक्ष्मीबाई साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com