जामखेड
जामखेड
सार्वमत

तहसीलदारांसह महसूलचे कर्मचारी जामखेडच्या रस्त्यावर

Arvind Arkhade

जामखेड|तालुका प्रतिनिधी|Jamkhed

तालुक्यात करोना बाधितांची संख्या वाढू लागली असल्याने अखेर महसूल विभागाने रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यासह महसूलच्या महिला कर्मचारी देखील रस्त्यावर उतरून डबलसीट दुचाकींवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

जामखेड तालुक्यात सध्या लोणी येथे 2, जवळके येथे 2, मोहरी 1 व जायभायवाडी येथे 1 रुग्ण आहेत. करोनामुक्त झालेल्या जामखेडला पुन्हा करोनाने शिरकाव केला असून, नागरिकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. मुंबई-पुण्याहून येणार्‍या बरोबरच परगावाहून शहरात येणार्‍या नागरिकांनी करोनाचा वानवळा आणला आहे.

करोनाने ग्रामीण भाग बाधित केला आहे. जामखेडच्या प्रशासनाने गेली तीन महिन्यांपासून डोळ्यात तेल घालून काम केले, मात्र आता हात टेकले आहेत. शहरातील जयहिंद चौक, खर्डा चौक, नगररोड या परिसरात रोज नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. चौकामध्ये दररोज वाहनांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्यासह तलाठी, कोतवाल, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी व महसूल विभागाच्या महिला कर्मचार्‍यांनी रस्त्यावर उतरून कारवाईला सुरुवात केली आहे.

तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनेक नागरिकांच्या वाहनांवर कारवाई केली. तहसीलदार स्वतः रस्त्यावर उतरल्याने नागरिकांनी देखील त्यांचे कौतुक केले. तसेच कर्मचार्‍यांकडून रस्त्यावर थांबून गप्पा मारणार्‍यांना लाठीचा प्रसाद मिळाला. रस्त्यावर येणार्‍या वाहनधारकांना कशाला, कुठे बाहेर जाता याची विचारणा करण्यात आली.

दुचाकी घेऊन डबल व ट्रिपल सीट फिरणार्‍या दुचाकीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. करोनाने त्रस्त झालेला जामखेड तातडीने करोनामुक्त होऊ शकला. जामखेड पॅटर्न म्हणून राज्याला आदर्शवत झालेल्या या तालुक्यात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे. सहा रुग्ण सापडल्याने आता पुन्हा उद्रेक होतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून येणार्‍या नागरिकांना थेट त्यांच्या मूळ गावी जाऊ न देता जामखेड व खर्डा येथे क्वारंटाईन करण्याचा निर्णय आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार नाईकवाडे यांनी घेतला. असा निर्णय घेणारा जामखेड हा राज्यातील पहिला तालुका ठरला. त्यामुळे करोनाला तालुक्यात आळा बसला. मात्र शेजारच्या जिल्ह्यात व तालुक्यात सर्व शिथिल आहे, त्याचा परिणाम जामखेडवर झाला असून, लोक प्रशासनाचेही ऐकण्यास तयार नाहीत.

मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणार्‍या नागरिकांना थेट त्यांच्या मूळ गावी जाऊ न देता जामखेड व खर्डा येथे क्वारंटाईन करण्याचा निर्णय अधिक कडक आणि काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. ग्रामीण भागात करोनाने पाय पसरण्यास सुरुवात केल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. जनतेने आता तरी गांभीर्याने करोनामुक्तीसाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा जामखेड तालुक्यात करोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Deshdoot
www.deshdoot.com