
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अधिकारी देखील माणूसच असतो अन् त्या अधिकार्यातही माणुसकी दडलेली असते. याचा प्रत्यय श्रीरामपूर तहसील कार्यालयात आलेल्या एका वृध्द महिलेला आला.
त्या महिलेस मदत केल्याने तहसीलदारांच्या रुपाने त्या आजीबाईंना देवच भेटला.
वृध्द महिला पुरुषांना शासनाच्या विविध योजनेचे मानधन मिळत असते; मात्र अनुदान सुरळीत सुरू ठेवण्यासाठी वेळोवेळी हयातीचे व इतर कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावी लागतात.
संजय निराधार योजनेचा लाभ मिळत असलेली एक वयोवृध्द महिला तहसील कार्यालयात तळमजल्यावर बसलेली होती. सकाळी नेहामीप्रमाणे तहसीलदार प्रशांत पाटील हे कार्यालयात आले. जिन्याच्या पायर्या चढत असताना त्यांची नजर त्या वृध्द महिलेवर गेली. ही महिला येथे आली म्हणजे हिचे नक्कीच तहसील कार्यालयात रेशन कार्डाचे काम असावे, अशी शंका आली.
जिना उतरून ते त्या आजीबाईजवळ आले. अतिशय वयोवृध्द झालेल्या त्या महिलेस तहसीलदार पाटील यांनी विचारले की, आजी काय काम आहे. त्यावर त्या आजीबाईंनी मला डोल मिळत आहे परंतु काही कागदपत्रे जमा नाही केली तर तो बंद होईल, असा निरोप आल्यामुळे गावातून आले. तहसीलदार पाटील यांनी तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे काम पाहत असलेल्या अधिकार्यांस खाली बोलविले.
अन् सर्व कागदपत्रांची पूर्तता बघून घेण्यास सांगितले. तोपर्यंत पाटील हे तिथेच उभे राहिले. त्या आजी बाईचे काम झाल्यावर तहसीलदार पाटील हे कार्यालयात जाण्यासाठी जिना चढू लागले. तोच त्या आजीबाईंनी पुन्हा हाक मारली. तहसीलदार पाटील यांना वाटले आणखी काही काम बाकी असेल म्हणून हाक मारली असेल ते पुन्हा त्या आजी बाईजवळ गेले व आस्थेने विचारले की तुमचे काम झाले का? अजून बाकी आहे.
आजीबाई म्हणाल्या काम तर झाले, पण दोन चार रुपये दिले असते तर फार बरे झाले असते. गावाकडे जायला. तहसीलदार पाटील यांनी आपल्या खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून त्या आजीबाईला दिली. अन् क्षणाचाही विचार न करता कार्यालयात गेले हे सर्व तिथे उभे असलेले नागरिक पहात होते. एकाने त्या आजीबाईजवळ जाऊन विचारले.
आजी तो माणूस कोण होता? माहिती आहे का? त्यावर आजी म्हणाली, नाही कोण होता? त्या व्यक्तीने सांगितले ते तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील आहेत. अन मग आजीबाईच्या डोळ्यात खळकन पाणी आले अन् आजीबाई इतकच म्हणाल्या, त्यांच्या रुपात माझा देवच आला होता, मला मदत कराया.