तहसील कार्यालयात राडा करणारे जेरबंद

'या' तालुक्यात घडली होती घटना
तहसील कार्यालयात राडा करणारे जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

नगर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत घुसून तहसीलदार, तलाठी व कर्मचार्‍यांना धक्काबुक्कीकरून गोंधळ घालणार्‍या दोघांना अखेर तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. सचिन एकनाथ एकाडे (वय 35 रा. सारसनगर, चिपाडे मळा, नगर), शाम नामदेव कोके (वय 53 रा. एकतानगर, ता. खेड जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

18 जानेवारी 2022 रोजी नगर तहसील कार्यालयात तहसीलदार, तलाठी व महसूल कर्मचारी यांची बैठक सुरू होती. त्यावेळी सचिन एकाडे व शाम कोके यांनी या बैठकीत प्रवेश करून तहसीलदार यांच्यासोबत हुज्जत घालून मोठमोठ्याने ओरडून तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्हाला भ्रष्टाचाराची लागण झाली आहे, असे म्हणत बैठकीस बसलेले तलाठी, मंडलअधिकारी, कर्मचारी यांना सर्वांना बघून घेतो अशा धमक्या दिल्या होत्या. तसेच तहसीलदार यांच्यासोबत अरेरावी करून बैठक खोलीतील खुर्च्या लोटून दिल्या, बैठकीस आलेल्या महिला तलाठी यांचेकडे बोट करून शिवीगाळ केेले. मोठमोठ्याने आरडाओरडा करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एकाडे व कोके विरूध्द भादंवि कलम 353, 186, 504, 506, 509, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले होते. दरम्यान आरोपीच्या अटकेसाठी तहसीलमधील कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, उपनिरीक्षक शुभांगी मोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, अविनाश वाकचौरे, वसिम पठाण, अहमद इनामदार, धीरज खंडागळे, शिरीष तरटे, सचिन जगताप, चेतन मोहिते, प्रशांत राठोड यांच्या पथकाने आरोपी एकाडे व कोके यांना दौंड रोडवरील खंडाळा (ता. नगर) शिवारातून अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक शुभांगी मोरे करीत आहेत.

अशी झाली अटक

तहसील कार्यालयात राडा करून आरोपी एकाडे व कोके पसार झाले होते. तोफखाना पोलिसांनी त्यांच्या घरी वेळोवेळी शोध घेतला; पण ते मिळून येत नव्हते. दरम्यान त्यांचे मोबाईलचे तांत्रिक विश्‍लेषन केले असता त्यांचे मोबाईल बंद होते. दरम्यानच्या काळात त्यांनी दुसरे सिम कार्ड घेतले. मोबाईल सेलच्या पोलीस कर्मचार्‍यांनी त्या नंबरचे तांत्रिक विश्‍लेषन केले असता ते दौंड रोडवरील खंडाळा (ता. नगर) शिवारात हॉटेल अदिती येथे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तत्काळ तेथे जात दोघांना ताब्यात घेत अटक केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com