श्रीक्षेत्र ताहाराबादहून पायी दिंडी सोहळा विठूरायाच्या भेटीला निघाला

श्रीसंत कवी महिपती महाराजांच्या पालखी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान
श्रीक्षेत्र ताहाराबादहून पायी दिंडी सोहळा विठूरायाच्या भेटीला निघाला

ताहाराबाद |वार्ताहर| Taharabad

श्रीसंत कवी महिपती महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सालाबाद प्रमाणे काल औपचारिक पद्धतीने पंढरीकडे प्रस्थान झाले.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र ताहाराबाद जवळील मल्हारवाडी येथील वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या अ‍ॅड. सुभाष घाडगे यांच्या वस्तीवरील पर्णकुटीत पालखीची व्यवस्था करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे परंपरा खंडित होऊ नये म्हणून औपचारिक पद्धतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि श्रीसंत कवी महिपती महाराजांच्या जयजयकारात प्रति पंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील भावभक्तीने भरलेला महिपती महाराजांचा पायी दिंडी सोहळा काल विधीवत पूजनानंतर विठूरायाच्या भेटीला मार्गस्थ झाला. प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे महिपती महाराजांच्या समाधी मंदिरात देवस्थानचे नवनिर्वाचित विश्वस्त राजेंद्र साबळे यांच्या हस्ते सपत्नीक पालखीचे विधीवत पूजन झाले. संतकवी महिपती महाराजांच्या समाधी मंदिर प्रांगणात दिंडीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. अश्वांचे टाळ-मृदुंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या गजरात पडलेले पदन्यास, फटाक्यांची आतषबाजी, सनई-चौघड्यांचा सूर, नानाविध फुलांची उधळण या भारून टाकणार्‍या वातावरणात भगव्या पताका धारण केलेल्या वारकर्‍यांची पावले पंढरीच्या दिशेने निघाली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी श्रीक्षेत्र ताहाराबाद ला वारकर्‍यांची उत्कंठा लागली होती.

काल मंगळवारी (दि.6) सकाळी 11 वाजता दिंडीचे प्रस्थान झाले. प्रारंभी श्री पांडुरंगाच्या मंदिरात बाबासाहेब वाळुंज यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. देवस्थान विश्वस्त आसाराम ढूस यांनी पायी दिंडी सोहळ्याची आख्यायिका सांगून वारीचे महत्त्व सांगितले. प्रास्तविक सुरसिंग पवार यांनी केले. राहुरी तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर यांनी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. विधीवत पूजन व आरतीनंतर हा सोहळा मल्हारवाडीकडे मार्गस्थ झाला.

यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष अविनाश कांबळे, आसाराम ढूस, बाळकृष्ण बानकर, शिवाजी बंगाळ, अ‍ॅड. अशोक किनकर, दत्तात्रय जगताप, रमेश नालकर, अशोक हांडे, मच्छिंद्र कोहकडे, सुभाष शिरसाठ, दत्तात्रय मुसमाडे, श्रीकृष्ण कांबळे, संजय कांबळे, बापू साहेब गागरे, शिवाजी कोळसे, नाना महाराज गागरे, बाळकृष्ण महाराज कांबळे, श्रीमती सुशीला वराळे, सुगंधाबाई बानकर, सुशीला मुसमाडे, लक्ष्मीबाई सोनवणे, सविताताई साबळे, बाळासाहेब मुसमाडे, राजू चव्हाण, कांता कदम, राजू झुगे, कामगार पोलीस पाटील किरण उदावंत, नारायण झावरे, सीताराम झावरे, तानाजी हारदे, रमेश हारदे, दत्तात्रय हारदे, वेणुनाथ औटी, दिलीप बिडवे, बाबासाहेब झावरे, दिलीप हारदे, राजेंद्र झावरे, ज्ञानेश्वर माने आदींसह भाविक उपस्थित होते.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालखी सोहळ्याला शुभसंदेश पाठवून आषाढी एकादशीला पालखी पंढरपूर येथे नेण्याचा प्रयत्न करू, असा शब्द दिला.

आषाढ वद्य नवमीला पालखी सोहळ्याचे पंढरीकडून श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे आगमन होते. ताहाराबादचा पालखी सोहळा पांडुरंगाच्या भेटीला जात नसून पांडुरंगाला ‘मूळ’ जात असतो, ही आख्यायिका आहे.

आषाढ वद्य नवमीपासून श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे पांडुरंग उत्सवास प्रारंभ होत असतो. परंतु कोविड-19 मुळे सर्व धार्मिक उत्सव मृगजळ ठरत असून वारकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com