अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार विजय राजु पठारे, अजय राजु पठारे या पठारे बंधूंसह त्यांच्या इतर

चार साथीदारांनी बालिकाश्रम रोडवरील कापड दुकान तसेच निलक्रांती चौकातील सायकल मार्टच्या दुकानात धुमाकूळ घालत कामगारांना मारहाण केली. त्यांच्याकडून बळजबरी पैसे वसूल केले. या प्रकरणी पठारे बंधूंसह सहा जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विजय राजु पठारे, अजय राजु पठारे, सुरज साठे, राहुल झेंडे, अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही) व मयूर चावरे (सर्व रा. सिद्धार्थनगर, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. अक्षय राजेंद्र जाधव (वय 26 रा. जाधव मळा, बालिकाश्रम रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

अक्षय जाधव यांचे बालिकाश्रम रोडवर रूबाब द फरफेक्ट मेन शॉप नावाचे कापड दुकान आहे. हे दुकान अक्षय जाधव व त्यांचा भाऊ सनी हे दोघे चालवितात. त्यांच्याकडे प्रेम विठ्ठल नन्नवरे व मुकुंद अर्जुन कांबळे असे दोघे कामगार आहेत. शनिवारी सायंकाळी पठारे बंधूंसह त्यांचे इतर साथीदार विना नंबरच्या चारचाकी वाहनातून फिर्यादी यांच्या दुकानासमोर आले. त्यांनी हातामध्ये लाकडी दांडके घेऊन दुकानात प्रवेश केला.

यावेळी दुकानातील ग्राहक भितीने निघून गेले. विजय पठारे हा दुकानातील कामगार कांबळे यांना म्हणाला, तु काऊंटरमधील पैसे दे, आम्ही येथील डॉन आहोत. तुम्ही आम्हाला कपडे फुकट द्यायचे, आम्हाला हाप्ता द्यायचा. असे म्हणत दुकानातील सामाना अस्तव्यस्त करून कामगार नन्नवरे यांच्याकडून पैसे व मोबाईल घेऊन विजय पठारे साथीदारांसह निघून गेला.

यानंतर गुन्हेगार पठारे बंधूंनी निलक्रांती चौकातील प्रवीण ठकसेन साळवे (रा. निलक्रांती चौक, नगर) यांच्या सुनील सायकल मार्ट या दुकानात घुसून दुकानातील काऊंटरमधील पाच हजार रूपये बळजबरीने काढून घेतले. विजय पठारे याने हातातील लाकडी दांडक्याने प्रवीण यांच्या मोबाईलवर मारून त्यांचा मोबाईल फोडून टाकला. यानंतर प्रवीण यांनी आरडाओरडा करताच पठारे बंधू व इतर आलेल्या चारचाकी वाहनातून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटना झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंके करीत आहे.

तडीपार पठारे बंधूंचा शहरात वावर

तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी 15 टोळ्यातील 67 जणांना जिल्ह्यातून तडीपार केले होते. यातील दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगारामध्ये विजय पठारे, त्याचा भाऊ अजय पठारे यांचा समावेश आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये विजय पठारे हा त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नगरमध्ये आला होता. त्यावेळी त्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. तडीपार असलेले पठारे बंधू नगर शहरात वावर करत असताना, दहशत निर्माण करत असताना पोलीस करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तोफखाना पोलिसांचे अभय

तडीपार पठारे बंधूं नगरमध्ये येत आपली दहशत निर्माण करीत आहे. त्यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहे. त्यांची व्यापारी वर्गावर दहशत आहे. तडीपार असतानाही ते व्यापारी वर्गाला धमकी देत पैसे वसूल करतात. विजय पठारे याने एका पोलीस कर्मचार्याला देखील मारहाण केली होती. असे असताना तोफखाना पोलीस पठारे बंधूंना अटक न करता अभय देत असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.