तलवारीने वाढदिवसाचा केक कापला

श्रीरामपुरातील दोन मित्रांना अटक
तलवारीने वाढदिवसाचा केक कापला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायणनगर, वॉर्ड नं. 1 या ठिकाणी एका तरुणाने आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून साजरा केला. याबाबतची माहिती मिळताच वाढदिवस साजरा करणारा तरुण व ज्याची तलवार आहे तो तरुण अशा दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे, पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल नरोडे, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गळे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार हे शहरात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे यांना माहिती मिळाली की, सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपवर एकजण तलवारीने केक कापत असताना दिसत होता. याबाबतची माहिती घेतली असता शहरातील लक्ष्मीनारायणनगर, वॉर्ड नं. 1 येथील ऋषिकेश सुनील गडाख असे नाव असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस ऋषीकेश गडाख याच्या घरी जावून या व्हीडिओबाबतची विचारपूस केली असता ही तलवार माझ्या वाढदिवसाला माझा मित्र प्रशांत शिवाजी भोसले (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) याने आणली होती. त्यानुसार पोलीस ऋषिकेश गडाख याला घेऊन शिरसगाव येथे प्रशांत भोसले याच्या घरी गेले. त्यास व्हीडिओमध्ये वापरलेल्या तलवारीबाबतची विचारपूस केली असता त्याने सदरची तलवार माझ्या घरातच आहे.असे सांगितले व सदरची तलवार घरातून काढून दिली. सदरची तलवार 1 हजार रुपये किंमतीची असून तिची लांबी मुठीसह 2 फूट 9 इंच लोखंडी मुठ, पुढील धारदार टोक अशा वर्णनाची ही तलवार मिळून आली. सदरची तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.

दि. 7 मे 2022 रोजी रात्री 8.15 वा. इंदिरानगर, शिरसगाव हद्द, अशोकनगर भागात प्रशांत शिवाजी भोसले याने विनापरवाना बेकायदेशीररित्या तलवार बाळगतांना आढळून आला व त्याचा मित्र ऋषिकेश सुनील गडाख याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापला असून या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 317/2022 प्रमाणे प्रशांत भोसले, ऋषिकेश गडाख यांचेविरुध्द आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरण पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.