
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे बाळासाहेब लांघे हा स्वतः जवळ तलवार बाळगताना आढळून आला. पोलिस पथकाने दि. 28 मे रोजी कारवाई करून बाळासाहेब लांघे याला तलवारीसह ताब्यात घेऊन गजाआड केले.
राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त खबर्या मार्फत माहिती मिळाली कि, आरोपी बाळासाहेब विठ्ठल लांघे हा स्वतः जवळ शरीरास घातक असणारे हत्यारे बाळगत आहे. खबर मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा व हवालदार दिनकर चव्हाण यांनी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे जाऊन आरोपी बाळासाहेब विठ्ठल लांघे याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी बाळासाहेब लांघे हा तलवार सारखे घातक हत्यार स्वतः जवळ बाळगत असताना दिसून आला. बाळासाहेब लांघे याला ताबडतोब तलवारीसह ताब्यात घेऊन गजाआड केले.
पोलीस हवालदार साईनाथ टेमकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब विठ्ठल लांघे याच्या विरोधात आर्म अॅक्ट प्रमाणे अनाधिकृतपणे शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार दिनकर चव्हाण हे करीत आहेत. राहुरी तालुक्यात वाळूतस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या वाळू तस्करीच्या धंद्यातून आजपर्यंत अनेक जणांचे बळी गेले आहेत. तालुक्यातील बहुतांश वाळूतस्कर स्वतः जवळ गावठी कट्टे, तलवार, गुप्ती सारखे हत्यारे बाळगून दहशत निर्माण करत असतात. या वाळूतस्करांच्या घराच्या झडत्या घेतल्यास गावठी कट्ट्यासह अनेक हत्यारे मिळून येतील, अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तालुक्यातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करून तालुक्याला भयमुक्त करावे, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.