स्वामित्व योजनेचा ना. काळे यांच्या 
हस्ते शहाजापूर येथे प्रारंभ

स्वामित्व योजनेचा ना. काळे यांच्या हस्ते शहाजापूर येथे प्रारंभ

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दिवसेंदिवस गावांची लोकसंख्या वाढतांना दिसत आहे. विकासाच्या विविध योजनांमुळे गावांमध्ये अनेक भौगोलिक बदल होत आहेत. जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र गावठाणांचे अभिलेख नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. जागेच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मालमत्तांचे मालकीपत्र नसल्याने कर्जपुरवठा मिळणे अडचणीचे होते. यासाठी शासनाच्या जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य व भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामित्व योजने अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन व जी.आय.एस. आधारित रेखांकन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ तालुक्यातील शहाजापूर येथे ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आशुतोष काळे म्हणाले, अनेक ग्रामपंचायतींकडे हद्दीचे नकाशे उपलब्ध नाहीत. त्यामुळे गावांतील सरकारी जमिनी आणि त्यावर झालेली अनधिकृत अतिक्रमणे, याबाबतची माहितीही बहुतांश ग्रामपंचायतींकडे उपलब्ध नाही. गावठाणांचे बिनचूक भूमापन केल्यावर ही माहिती ग्रामपंचायतींना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी गावाकडे उपलब्ध असलेल्या गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. हि योजना प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी व गावातील नागरिकांना फायदेशीर आहे. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावठाण मिळकतींची मोजणी करून संबंधितांना मिळकत पत्रिका दिल्या जाणार आहेत.

या योजनेमध्ये राज्यातील सिटी सर्व्हे अंतर्गत येणार्‍या गावांची निवड करण्यात आली आहे. दोन ऑक्टोबरपर्यंत मिळकत पत्रिकांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट भूमी अभिलेख विभागाकडून ठेवण्यात आले आहे. स्वामित्व योजनेनुसार मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याने मालमत्तेवरुन होणारे वाद मिटणार आहेत. तसेच संबंधित नागरिकांना कर्ज मिळण्याचा मार्ग देखील सुलभ होणार आहे. ज्याप्रमाणे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी होत आहे त्याप्रमाणे शेतीच्या बांधावरून होणारे वाद कायमस्वरूपी मिटले जावे यासाठी शेतीची देखील मोजणी ड्रोनच्या माध्यमातून होण्यासाठी शासनाने व्यापक मोहीम हाती घ्यावी अशी अपेक्षा ना. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी सरपंच सचिन वाबळे, बाबासाहेब वाबळे, भाऊसाहेब वाबळे, शिवाजी वर्पे, सुखदेव वाबळे, इंद्रभान ढोमसे, पांडुरंग ढोमसे, विठ्ठल वाबळे, अल्ताफ पटेल, उपसरपंच शोएब पटेल, बाळासाहेब ढोमसे, मच्छिन्द्र देशमुख, दत्तात्रय बोरसे, गणपत बोरसे, संजय सूर्यवंशी, सागर वाबळे, सुनील देशमुख, विश्वास देशमुख, नानासाहेब वाबळे, राजेंद्र वाबळे, राजेंद्र माळी, प्रविण सपकळ, अरुण वाबळे, सीताराम बोरसे, मुश्ताक पटेल, भूमी अभिलेख उपअधीक्षक संजय भास्कर, मुख्यालय सहाय्यक सुनील कडू, सर्वे अधिकारी संदीप कदम, निमतानदार नितीन जगधने, भूमापक भास्कर हराळ, तलाठी गोविंद खैरनार, ग्रामसेविका श्रीमती आरती टोरपे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com