अहमदनगर (प्रतिनिधी) -

स्वच्छ भारत अभियानामध्ये यंदा फाईव्हस्टर मानांकन मिळविण्यासाठी नगर महापालिकेने कंबर कसली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी

व कर्मचार्यांनी शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्यावर भर दिला आहे. 2019-20 मध्ये भारत स्वच्छ अभियानामध्ये महानगरपालिकेला थ्री स्टार मानांकन मिळाले होते. 2020-21 मध्ये फाईव्हस्टार मानांकन मिळविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असल्याचे घनकचरा विभागप्रमुख डॉ. नरसिंह पैठणकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पैठणकर म्हणाले, भारत स्वच्छ अभियानांतर्गत महानगरपालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी अधिकारी व कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवत आहेत. या मोहिमेत विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होईल. स्वच्छता अभियानामध्ये मागील वर्षी अधिकारी व कर्मचार्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे देशामध्ये 40 व्या क्रमांकावर आपले शहर झळकले होते. आता यावर्षी फा्ईव्हस्टार मानांकन मिळविण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यांना विचारण्यात येणार्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावी, जेणेकरुन शहराच्या नावलौकिकात भर पडेल, असे ते म्हणाले.

सफाई कर्मचार्यांबरोबर महापालिकेचे इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी जाऊन हातात झाडू घेऊन साफसफाई करतात. तसेच दगड, माती, फुटपाथ, गवत काढण्याचे काम केले जाते. या स्वच्छता अभियानात नागरिकांनीही सहभाग घेऊन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आहवान मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.