
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
कांद्याला प्रती क्विंटल 2 हजार 500 रुपये भाव मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज 28 फेब्रुवारी रोजी नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी बाजार समितीसमोर सकाळी साडेदहा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
कांदा भाव तसेच अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. निर्यातीवर 500 रूपये प्रोत्साहन पर अनुदान मिळावे. नाफेड मार्फत कांदा 2 हजार 500 रूपये क्विंटलने खरेदी करावा. अतिवृष्टीने व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पंचनामे पूर्ण होऊन चार महिने होऊन देखील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
राज्य व केंद्र सरकारला माहिती देऊन अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसानीचा एक रूपया देखील मिळालेला नाही. तो तात्काळ बँक खात्यात जमा करावा. आदी मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आंदोलनात तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले आहे.