बँकांनी शेतकर्‍यांना वेठीस धरल्यास तीव्र आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिननाथ पाचरणे यांचा इशारा
बँकांनी शेतकर्‍यांना वेठीस धरल्यास तीव्र आंदोलन

राहाता |प्रतिनिधी| Rahata

बँकानी शेतकर्‍यांना वेठीस धरल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मिननाथ पाचरणे यांनी दिला आहे.

याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात पाचारणे यांनी म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून अनेक नैसर्गिक आपत्तीचा शेतकरी सामना करत आहे. त्याचबरोबर करोनाच्या परिस्थितीमुळे कुठल्याही शेतमालास योग्य तो भाव मिळत नाही. या महामारीच्या काळात दुधाचे दरही घसरल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याच बरोबर भाजीपाल्याची दयनीय अवस्था पाहावयास मिळत आहे. काही शेतकर्‍यांनी तर आपल्या पिकांना भाव न मिळाल्यामुळे त्या पिकावर नांगर फिरवल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे.शेती मशागतीसाठी लागणारे इंधनाचे दर वाढल्याने मशागत करणे खर्चिक झाले आहे.

या परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांना बँक, पतसंस्था, फायनान्स कंपनीने हप्ता वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचे जोर जबरदस्ती करू नये तसेच दडपशाही करू नये. सर्व कर्जाची हप्ते संयमाने शांततेने वसूल करावे. शेतकर्‍यांना वेठीस धरल्यास माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मिननाथ पाचरणे यांनी दिला आहे.

या प्रसिद्धीपत्रावर शंकरराव लहारे, अनिकेत धनवटे, नवनाथ गायके, भाऊसाहेब येलम, ज्ञानेश्वर सोडणार, प्रमोद पाचरणे आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com