विक्रम राठोडांच्या राजकीय करिअरला गांधींचा सपोर्ट

पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार न देण्याची मागणी
सुवेंद्र गांधी -विक्रम राठोड
सुवेंद्र गांधी -विक्रम राठोड

अहमदनगर (प्रतिनिधी) -

पितृछत्र हरपल्यानंतर विक्रम राठोड यांच्या राजकीय करिअरसाठी माजी खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी सपोर्टचा

निर्णय घेतला आहे. आगामी पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार न देता राठोड यांना समर्थन द्यावे अशी मागणी करणारे पत्र गांधी यांनी पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांना दिले आहे. यासदंर्भात गांधी हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष वेधणार आहे.

श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द झाल्याने महानगरपालिकेच्या प्रभाग 9 मध्ये आगामी काळात पोट निवडणूक होणार आहे. ही निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने उमेदवार न देता शिवसेनेचे उपनेते स्व.अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांना या प्रभागातून नगरसेवक होण्यासाठी पाठींबा द्यावा. स्व.अनिल राठोड यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे सुवेंद्र गांधी यांनी गंधे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राजकीय प्रवास खडतर असतानाही गत 40 ते 50 वर्षांपासून स्व. अनिल राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत शहरात काम केले. सर्वसामन्य नागरिकांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रभाग 9 मधील पोट निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देवू नये, अशी मागणी गांधी यांनी केली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्व.अनिल राठोड यांच्यात जिव्हाळ्याचा स्नेह होता. प्रभाग 9 मध्ये होणार्‍या पोटनिवडणुकी साठी भाजपाने उमेदवार न देता विक्रम राठोड यांना पाठींबा द्यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडेही करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी सांगितले.

राजकीय वाद तरीही साथ

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी आणि स्व.अनिल राठोड यांना कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर दोघांनीही शून्यातून विश्व निर्माण केले. दोघांचा राजकीय प्रवास बरोबर सुरु झाला. दिलीप गांधी व अनिल राठोड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून ताणतणाव व राजकीय वाद होता, तरी सुमारे 25-30 वर्ष दोघांनी भाजपा सेना युतीत बरोबर काम केले होते. खासदार म्हणून निवडून येण्यात अनिल राठोड यांनी सहकार्य केले तर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी दिलीप गांधी यांनी एकमेकांना सहकार्य केल्याची आठवणही सुवेंद्र गांधी यांनी पत्रात करून दिली आहे. पदांच्या माध्यमातून दोघांनी शहराच्या व जिल्ह्याच्या विकासास हातभार लावत सर्वसामान्य जनतेची कामे केली आहेत. हे विसरून चालणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com