वाळूमाफियांना अभय देणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करा : झावरे

मातुलठाण येथे तस्कर जोमात तर प्रशासन कोमात
वाळूमाफियांना अभय देणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करा : झावरे

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) - करोनाचा हाहाकार माजलेला असताना श्रीरामपूर तालुक्यात मोठया प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. श्रीरामपूर येथील मातुलठाण येथे शासकीय लिलावातून बेसुमार अवैध वाळूउपसा सुरू असून त्यावर आर्थिक स्वार्थापोटी जाणूनबुजून डोळेझाक करणार्‍या तहसीलदार व प्रांताधिकारी यांचे त्वरित निलंबन करून वाळू लिलाव बंद करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केली आहे.

झावरे म्हणाले, श्रीरामपूर येथील मातुलठाण येथे गोदावरी नदीतून वाळूउपसा करण्याचा लिलाव सुरू असून तो ठेका घेणार्‍यांनी आजपर्यंत नदी पात्रात अनाधिकृत जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर, व इतर मशिनरीच्या सहाय्याने दररोज 300 ढंपर वाळू उपसा केला आहे. हा अनाधिकृत वाळू उपसा तहसिलदार, प्रांत, सर्कल, तलाठी, पोलिस अधिकारी यांच्याशी आर्थीक संगनमत करून केला जात आहे. त्यामुळे शासनाला मिळणार्‍या महसुलाचे कोट्यायावधी रूपयांचे नुकसान होते आहे. लिलाव धारकाने अधिकार्‍याशी संगनमत करून लिलावामध्ये नमुद केल्यापैकी 100 पट वाळूउपसा केला आहे.

वाळू माफियांना येथील बड्या राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्यामुळे स्थानिक प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अहमदनगर जिल्हा रेड झोन मध्ये असून श्रीरामपूर येथून 24 तास नदीतून वाळूउपसा सुरू आहे. करोना महामारीचा धोका तिथून वाढू शकतो त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून सदर ठेका बंद करावा. तर किती वाळूउपसा झाला याचे मोजमाप भुजल सर्वेक्षण कार्यालय किंवा भूमापन कार्यालय अथवा सार्वजनिक बांधकाम विभागा कडुन करण्यात यावे. लिलावामध्ये नमुद केल्यापेक्षा जास्त किती वाळूउपसा झाला याचे मोजमाप करावे. लिलाव धारकाचे डिपॉझिट तात्काळ जप्त करावे व दंडात्मक कार्यवाही नियमा प्रमाणे करावी तसेच जास्तीचे वाळूउपसा करणार्‍या वाळू ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी व याला जबाबदार असलेले स्थानिक तहसीलदार व प्रांताधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी झावरे यांनी केली.

Related Stories

No stories found.