बडतर्फ 382 पैकी 40 कर्मचारी कामावर हजर

अपिल मुदत संपली || एसटी महामंडळाच्या निर्णयाकडे लक्ष
बडतर्फ 382 पैकी 40 कर्मचारी कामावर हजर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सरकारमध्ये विलिनीकरणासाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्‍यांवर एसटी महामंडळाने बडतर्फीची कारवाई केल्यानंतर परिवाहन मंत्री अनिल परब यांनी त्यांना वारंवार कामावर येण्याची संधी दिली. तरीही कर्मचार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता परिवहनमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांनी 31 मार्चपर्यंत संधी देत बडतर्फ कर्मचार्‍यांनी अपील करण्याचे आवाहन केले होते. परंतु या मुदतीपर्यंत जिल्ह्यात बडतर्फ 382 कर्मचार्‍यांंपैकी केवळ 40 जणांनीच अपील केले आहे. यामुळे एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्री उर्वरित कर्मचार्‍यांवर काय करावाई करणार याकडे लक्ष आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरात एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असून विद्यार्थ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संपामुळे महामंडळाला कोट्यवधींचा तोटा झालेला आहे. तरीही परिवहनमंत्री परब यांनी कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्यासाठी आधी 10 मार्चपर्यंतची व नंतर 31 मार्चची मुदत दिली. बडतर्फ कर्मचार्‍यांवरील कारवाई मागे घेण्यासाठी त्यांनी अपील करून तसा अर्ज करणे गरजेचे होते. अपील केल्यानंतर कारवाई मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. नगर जिल्ह्यात एकूण 382 कर्मचार्‍यांना बडतर्फ केले होते. त्यात केवळ 40 जणांनी 31 मार्च या मुदतीपर्यंत कारवाई मागे घेण्याचा अर्ज केला आहे. त्यामुळे बाकी कर्मचार्‍यांची सेवा आता समाप्त होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, जिल्ह्यात एसटीची 11 आगारे, विभागीय कार्यालय, वर्कशॉप असे एकूण साडेतीन हजार एसटी कर्मचारी आहेत. त्यातील 1 हजार 500 ते 1 हजार 600 कर्मचारी सध्या कामावर हजर असून, अजूनही 1 हजार 900 ते 2 हजार कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे आता कामावर न येणार्‍या या कर्मचार्‍यांबाबत महामंडळ काय निर्णय घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निलंबित 306 पैकी 75 कामावर

प्रारंभी नोटिसा देऊनही कामावर हजर होत नसल्याने महामंडळाने टप्प्याटप्प्याने 306 कर्मचार्‍यांना निलंबित केले. नंतर त्यातील 75 जण कामावर हजर झाल्याने त्यांची कारवाई रद्द करण्यात आली. निलंबित झालेल्यांना अद्यापही कामावर परतण्याची संधी दिली जात आहे. 306 निलंबीत कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे एसटी कर्मचार्‍यांचे लक्ष आहे.

Related Stories

No stories found.