सुरेशनगरच्या रेशनधान्य दुकान साठा पडताळणीत आढळली मोठी तफावत

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू || 317 क्विंटल तांदूळ व 63 क्विंटल गहू आढळला जास्त || चनाडाळ व ज्वारी आढळलीच नाही
सुरेशनगरच्या रेशनधान्य दुकान साठा पडताळणीत आढळली मोठी तफावत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे दि. 21 ऑक्टोबरला रेशनचा बेकायदा धान्यसाठा पकडण्यात आल्यानंतर या प्रकरणातील आरोपीच्या सुरेशनगर येथील धान्य दुकानात पुरवठा विभागाचे अधिकारी व तहसीलदारांनी छापा टाकून धान्य पुरवठा विभागाच्या गोदामात जमा केल्यानंतर सदर आरोपीस दिलेले धान्य व वितरित केलेले धान्य यात मोठी तफावत आढळून आली. याबाबत दिलेल्या अहवालावरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत माहिती अशी की, दि. 21 ऑक्टोबर रोजी भानसहिवरे येथे रेशनच्या धान्याचा बेकायदा साठा पकडल्यानंतर या प्रकरणातील आरोपी सुरेश दगडू उभेदळ याच्याविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3, 6 (क), 7 व 8 नुसार गुन्हा दाखल झाला.

सदर धान्य दुकानदाराचे दुकान तेव्हापासून बंद झाल्याने लोकांची गैरसोय होवू नये म्हणून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व नगरचे पुरवठा विभागाचे तहसीलदार अभिजीत वांढेकर यांच्यासह पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी दि. 1 नोव्हेंबर रोजी सुरेशनगर येथे जावून सदर आरोपीच्या दुकानातील धान्य साठा ताब्यात घेवून पुरवठा विभागात जमा केला. या धान्याची मोजणी करुन सदर दुकानदाराला दिलेला वार्षिक धान्यसाठा व त्याने पॉस मशिनद्वारे वितरीत केलेले धान्य याची पडताळणी करुन अहवाल तयार करण्यात आला.

तपासणीच्यावेळी सुरेश दगडू उभेदळ यांच्या दुकानात वार्षिक धान्य साठा पडताळणीनुसार 38 किंटल 8 किलो इतका गहू अपेक्षित होता. प्रत्यक्षात तपासणीच्यावेळी 101 किंटल गहू आढळून आला आला. 62 क्विंटल 92 किलो अधिक मिळून आला. वार्षिक धान्य साठा पडताळणीनुसार तपासणीच्यावेळी तांदळाचा साठा शून्य असणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात 317 क्विंटल तांदूळ मिळून आला. साखर 77 किलो असायला हवी होती. प्रत्यक्षात ती 2 क्विंटल मिळून आली. म्हणजे 1 क्विंटल 23 किलो अधिक आढळली. चनाडाळ 2 क्विंटल 69 किलो अपेक्षित होती. प्रत्यक्षात तपासणीवेळी ती आढळलीच नाही. ज्वारी 10 क्विंटल 25 किलो साठा आवश्यक होता. मात्र ज्वारीदेखील आढळली नाही.

जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी याबाबत नेवाशाच्या तहसीलदारांना पत्र पाठविले असून आपण सदर धान्य दुकानाचा साठा पडताळणी अहवाल सदर केला. त्यात आढळलेली तफावत ही सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करावयाच्या शिधावस्तूंचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याबाबत जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 अन्वये प्रचलित कायद्यानुसार संबंधीत परवानाधारक सुरेश दगडू उभेदळ यांचेविरुद्ध फौजदारी कार्यवाही करुन याबाबत अहवाल सादर करावा,असे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी नेवासा तहसीलदारांना लेखी आदेश दिले आहेत.

दरम्यान याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दुजोरा दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com