सार्वमत

युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल-नवले

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

तालुक्यात युरीया या खताचा तुटवडा आला आहे. गेली काही दिवस युरीया खत ऊपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांना न्याय द्यावा अन्यथा करोनाच्या काळातही शेतकरी तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले यांनी दिला आहे.

उन्हाळी टोमॅटोवरती आलेल्या व्हायरसमुळे कृषी विभागाने टोमॅटोच्या हायरीस्कचे पत्र शेतकर्‍यांना पाठवले आहे. टोमॅटो पिकवणे सोपे नाही. म्हणून शेतकर्‍यांनी पावसाळी हंगामात पिक बदल करायचा ठरवून सोयाबीन करण्याचे ठरवले. महागाचे बियाणे आणुन जमीनीत योग्य ओल असताना पेरण्या केल्या.

परंतु सदोष बियाण्यामुळे सोयाबीनचा ऊतारच झाला नाही. पुन्हा दुबार पेरणी केली व पाऊस गायब झाल्याने तीनदा पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर येते की काय अशी भिती निर्माण झाली आहे. गेले काही दिवसांपासून अकोले तालुक्यात खतच उपलब्ध होत नसल्यामुळे सगळीकडून संकटात आलेला शेतकरी कृषी विभागाच्या अनास्थेचा बळी ठरत आहे. आता मान्सुन सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. एकदा पाऊस सुरु झाल्यावर मानसांना घराच्या बाहेर पडणे मुश्कील होऊन जाते.

त्यामुळे युरीया व कृषीनिविष्ठा घरात साठा करुन ठेवल्याशिवाय आदीवासी शेतकर्‍यांना पर्याय नसतो. मध्यंतरी कृषी सेवा केंद्रांचा संप, करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा होत असलेले लाकडाऊन यामुळे दुकाने बंद होती. कृषी विभागाने गाजावाजा करत सुरु केलेली बांधावर खते व निविष्ठा या योजनेचाही बोजवारा उडालेला आहे. तशातच युरीया खत मिळणे शेतकर्‍यांना दुरापास्त झालेले आहे.

शेतीच्या या सर्व अडचणीचा सामना करण्याचं बळ जो दुधधंदा देतो, त्याही दुधास भाव नसल्याने हा धंदा संपण्याची चिन्हे आहेत. अशा सर्व दृष्टचक्रात शेतकरी अडकला असल्याचे नवले यांनी म्हंटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com