सुरेगाव जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड

सुरेगाव व धामोरी गणात इच्छुकांच्या भाऊगर्दीने डोकेदुखी वाढणार
सुरेगाव जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड

चासनळी |वार्ताहर| Chasnali

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गोदाकाठच्या सुरेगाव जिल्हा परिषद गटाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्यामुळे मातब्बर इच्छुकांचा हिरमोड झाला आहे

काळे गटाचा बालेकिल्ला असलेला हा भाग कायम त्यांच्याच अधिपत्याखाली राहिलेला आहे. मागील निवडणुकीत हा गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित होता. या निवडणुकीत कारवाडी येथील सुधाकर दंडवते यांनी एकहाती बाजी मारली. कोल्हे गटाकडून मातब्बर उमेदवार संभाजीराव गावंड यांना उमेदवारी देण्यात आली. निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत असताना आदल्या दिवशी निवडणुकीची चक्रे फिरली.

त्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत गडावरून रसद येईल असे वाटत असताना अचानक रसद येणार नाही असा आदेश आला. त्यासरशी सेनापती आणि सैनिकांनी आपली शस्त्रे म्यान केली आणि घरी निघून गेले. समोर सगळे आलबेल असताना दुसर्‍या दिवशी फक्त रामभरोसे म्हणून निवडणूक लढवली. त्यात सुधाकर दंडवते यांनी बाजी मारली.

या निवडणुकीत संपूर्ण तालुक्यात जिल्हा परिषदेत आरक्षणावरून महिलांचा बोलबाला असणार आहे. मात्र आता खरी भिस्त आहे ती सुरेगाव व धामोरी गणावर. सुरेगाव गण ओबीसीसाठी आरक्षण असून धामोरी गण सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे तेथे इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. पण कोणाचीही नावे पुढे आली नसली तरी इच्छुक भरपूर आहेत. मागील निवडणुकीत धामोरी गणात रवंदा येथील अनिल कदम यांनी बाजी मारली. मात्र चासनळी येथील अण्णासाहेब चांदगुडे यांनी बंडखोरी करत निवडणुकीत रंगत आणली. त्यांनी घेतलेली मते विचार करायला लावणारी होती.

आता या निवडणुकीत रवंदा व सोनारी हे दोन गावे ब्राह्मणगाव गटास जोडल्यामुळे सांगवी, धामोरी व चासनळी अशी तीन प्रमुख गावे या गणात येतात. सुरेगाव गणात एकतर्फी लढत असल्यामुळे पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार आहे. तिसरा गट अस्तित्वात नसल्यामुळे या गटात व गणात काळे व कोल्हे यांच्यातच लढत रंगणार आहे.

शेवटी सुरेगाव गट, गण आणि धामोरी गणात इच्छुक भरपूर असले तरी चर्चा फक्त गावापुरती मर्यादित चालू आहे. कारण उमेदवार शेवटी पक्षश्रेष्ठी ठरविणार असल्यामुळे उमेदवारी मलाच मिळेल असे ठामपणे कुणी सांगू शकत नाही. त्यात काळे गटाच्या बालेकिल्ल्यात कोल्हे गटाला मोठी कसरत करावी लागणार आहे. शेवटी लढत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com