सुरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी

सुरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी

कोळपेवाडी |प्रतिनिधी| Kolpewadi

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या आ. काळे यांच्या बालेकिल्ल्यातील सुरेगाव ग्रामपंचायत सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने इच्छुकांच्या भाऊगर्दी मध्ये वाढ झाली आहे. आ. आशुतोष काळे जो उमेदवार देतील तो अंतिम राहणार असून अद्याप उमेदवारीवर शिक्कामोर्तब न झाल्याने इच्छुकांनी मतदार राजाच्या गाठीभेटीवर जोर देत नेत्यांपर्यंत संदेश देण्यास सुरुवात केली आहे.

17 सदस्य संख्या असणारी सुरेगाव ग्रामपंचायत काळे गटाच्या बालेकिल्ल्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. स्थापनेपासून ग्रामपंचायतीवर आ. काळे गटाचे प्रभुत्व आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आ. काळे गटाचे 15 तर कोल्हे गटाचे दोन सदस्य विजयी झाले. जनतेतून सरपंच पदासाठी शशिकांत वाबळे यांनी बाजी मारत पाच वर्षे विविध विकास कामांद्वारे ग्रामस्थांची मने जिंकत नेत्याच्या विश्वासास पात्र राहिले. 6 प्रभागांतून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 17 उमेदवार निवडून द्यावयाचे असून सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने सत्तेवर राहिलेल्या उमेदवारासह अनेकांनी नेत्यांना आपणच योग्य उमेदवार असल्याचे पटवून देण्यासाठी कार्यकर्ते कामाला लावले आहेत.

आगामी येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवताना पक्षांतर्गत गटातून विरोध होऊ नये यासाठी धुरंधर कार्यकर्त्यांनी विरोध बाजूला ठेवून दिलजमाई करण्यास सुरुवात केली आहे. कर्मवीर काळे कारखान्याने जलजीवन पाणी योजना व स्मशानभूमीसाठी जागा ग्रामपंचायतीला विनामोबदला दिल्याने ग्रामस्थांप्रती असणारे आपले दायित्व अधोरेखित केल्याने ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील बालेकिल्ल्यात निष्ठेने निवडक मावळ्यांसह काळे गटाशी एकाकी झुंज देणारे कोल्हे गटाचे विश्वासू शिलेदार विलासराव वाबळे यांनी गटातील कार्यकर्त्यांचे सरपंच पदासाठी उमेदवारी देण्यासाठी नेत्याकडे आग्रह धरला असला तरी ऐनवेळी सौभाग्यवतींना मैदानात उतरण्याची तयारी ठेवली आहे. सुरेगाव सोसायटीमध्ये काळे-परजणे युतीला धोबी पछाड देत विलासराव वाबळे यांनी तेरा उमेदवार राजकीय डावपेच आखत निवडून आणल्याने कोल्हे गटाचा सुरेगावात राजकीय मनसुबा वाढवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनाधार वाढवणार्‍या एकनिष्ठ उमेदवाराला आ. आशुतोष काळे उमेदवारी बहाल करणार असले तरी अद्याप सरपंच पदाचे उमेदवार जाहीर न झाल्याने अनेकांच्या मनात धाकधूक वाढली आहे.

आज फॉर्म भरण्याचा पहिला दिवस आहे. काळे गटाकडून सुमनताई वाल्मिकराव कोळपे, सोनाली शशिकांत वाबळे, स्वप्नजा प्रशांत वाबळे, वैशाली संजय वाबळे, वनिता सचिन कोळपे यांची नावे आघाडीवर आहेत तर कोल्हे गटाकडून रुपाली विलास वाबळे, प्रमिला प्रताप वाबळे, मंगला गोरक्षनाथ कदम, मंगला राजेंद्र भंडारी, सुनीता सुनील वाबळे ही नावे चर्चेत आहेत. सामाजिक कार्यकर्ते भागवतराव कदम हे आपल्या सौभाग्यवती शामाताई कदम यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. एकूणच इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे सुरेगाव ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com