सुरत-हैद्राबाद महामार्गाच्या भूमापन प्रक्रियेस खडांबेत विरोध

आधी मोबदला जाहीर करण्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकर्‍यांचा आक्रमक पवित्रा
सुरत-हैद्राबाद महामार्गाच्या भूमापन प्रक्रियेस खडांबेत विरोध

उंबरे |वार्ताहर| Umbare

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि भारतमाला प्रकल्पातील नव्याने होऊ घातलेल्या सुरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे या महामार्गाच्या जमीन मोजणी प्रक्रियेसाठी आलेल्या पथकाला खडांबे खुर्द येथे 15 सप्टेंबर रोजी सडे, वांबोरी, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रूक या गावांतील 70 ते 80 शेतकरी आणि महिलांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पथकाला माघारी फिरावे लागले.

सुरत-हैद्राबाद महामार्गासाठी जमीन संपादित करण्याबाबत शेतकर्‍यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या महामार्गाच्या जमीन मोजनीसाठी राहुरी येथील भूमिअभिलेख विभागाचे भूमापन अधिकारी कुलकर्णी यांच्या समवेत सुरत-हैद्राराबाद ग्रीनफिल्ड ची सर्व्हेअर एजन्सी आर. व्ही. असोसिएटचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी येणार असल्याने खडांबे येथील कामगार तलाठी अमोल कदम व त्यांचे सहकारी दीपक मकासरे आले असता शेतकर्‍यांनी त्यां तीव्र्र विरोध केला. बहुतांश बाधीत शेतकरी हे अल्पभूधारक असून महामार्गासाठी जमिनी गेल्यास शेतकरी भुमिहिन होईल. शासनाने तीन वर्षावरील खरेदी-विक्री व्यवहाराची सरासरी काढून मोबदला देण्याच्या निर्णयावर शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त करीत या मोजणी प्रक्रियेला तीव्र विरोध केला.

शेतकर्‍यांना विश्वासात न घेता, हरकती विचारात न घेता, हुकूमशाही पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे. बागायती जमिनीबाबत राजपत्रात जमिनीच्या नोंदी जिरायती क्षेत्र म्हणून केलेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यात याव्यात. जमिनीच्या मोबदल्याबाबत जमिनीचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा, नंतरच पुढील कार्यवाही करावी. 7/12 उतार्‍यावरील हुकुमशाही पद्धतीने केलेल्या नोंदीबाबत घेतलेल्या हरकतीच्या मुद्यांवर कोणतीही चर्चा न करता 7/12 उतार्‍यातील इतर हक्कात केलेली महामार्गाची नोंद तात्काळ रद्द करावी. शेतकर्‍यांच्या शेतात जाण्यासाठी सर्व्हिस रोड व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, ठिकठिकाणी अंडर पास करणे गरजेेचे आहे. त्याबद्दलही कोणताच निर्णय आद्याप झालेला नाही. या मागण्यांचा विचार करून योग्य तो निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली.

खडांबे खुर्द येथील बाधीत शेतकरी संजय हरिश्चंद्रे म्हणाले, सर्व शेतकरी हे अल्पभूधारक असून सुरत-हैद्राबाद महामार्गात जमिनी गेल्यास शेतकरी भुमिहिन होईल. तसेच हा रस्ता नेमका 70 की 100 फूट हेही शेतकर्‍यांना आधी लेखी स्वरूपात कळवावे.

शेतकरी सर्जेराव पटारे यांनी आपला संताप व्यक्त करीत शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच लेखी स्वरुपात जमिनीचा मोबदला हा चालू बाजार भावाप्रमाणे द्यावा. अन्यथा जमिनीची मोजणी प्रक्रियेचे काम करू दिले जाणार नाही, असे सांगीतले.

गणेश पारे म्हणाले, भूसंपादनातून मिळालेल्या पैशातून मी किती दिवस उपजीविका चालवणार? दुसरीकडे जामीन खरेदी करावयाची असल्यास या जमीनीचे मूल्यांकन हे स्थानिक आणि चालू बाजार भावाने व्हावे. याबाबत लेखी स्वरूपात आश्वासन द्यावे.

देवीदास कल्हापुरे म्हणाले, आमचा विरोध शासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर आहे. त्या कार्यपद्धतीत सुधारणा करुन सर्व बाधीत शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घ्यावेत.

नानासाहेब हरिश्चंद्रे म्हणाले, आमच्या मागण्यांचा शासनस्तरावर सर्वसमावेशक विचार होण्याकरिता अनेकदा निवेदने देलेली आहेत. त्याचा अजूनही विचार झालेला नाही. म्हणून आता आम्ही मागे हटणार नाही.

अविनाश कल्हापुरे म्हणाले, माझ्या शेतात खुला गाईंचा गोठा असून मी लाखो रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. माझा दुग्ध व्यवसाय मोडकळीस येणार आहे.

यावेळी प्रभाकर हरिश्चंद्रे, प्रकाश हरिश्चंद्रे, मंगेश हरिश्चंद्रे, देविदास खळेकर, शब्बीर पठाण, रवींद्र हरिश्चंद्रे, विकास खळेकर, मयूर हरिश्चंद्रे, भाऊ हरिश्चंद्रे, शिवाजी खळेकर, वसंत साबळे, शामराव हाडोळे, सुरेश काचोळे, प्रकाश कल्हापुरे, मल्हारी हरिश्चंद्रे, प्रशांत हाडोळे, दत्तात्रय पवार, सुरेशराव धोंडे, किशोर हरिश्चंद्रे, भाऊसाहेब खळेकर, जनार्दन मकासरे, प्रसाद पवार, बाळासाहेब कल्हापुरे, किशोर पवार, अभिनव काळे, गणेश लहारे, किरण हरिश्चंद्रे, स्वप्निल खळेकर, दीपक नन्नवरे, ज्ञानदेव साळवे, विकास साळवे, बाबासाहेब हरिश्चंद्रे, बाबसाहेब धोंडे, मकरंद कारले, किरण कल्हापुरे, दत्तात्रय दळवी, नानासाहेब अकोलकर, गंगाराम कारले, राहुल कल्हापुरे, किरण कल्हापुरे, बाळासाहेब हरिश्चंद्रे, चंद्रकांत पवार, तसेच मंदाबाई पटारे, विणा पटारे, सौ. सविता साळवे आदी बाधीत शेतकरी, महिला शेतकरी व तरुणवर्ग उपस्थित होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com