राहुरीत सुरत-हैद्राबाद महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकर्‍यांनी केला विरोध

गुणांक दोन प्रमाणे मोबदला देण्यासाठी लेखी आश्वासनाची मागणी
राहुरीत सुरत-हैद्राबाद महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकर्‍यांनी केला विरोध

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सुरत-हैद्राबाद हायवेच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना मंगळवारी राहुरी येथील शेतकर्‍यांनी पुन्हा विरोध करून गुणांक दोन प्रमाणे जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. अधिकार्‍यांनी यावर जिल्हाधिकार्‍यांशी बैठक लावून चर्चा करण्याचे आश्वासन शेतकर्‍यांना दिले.

गेल्या दोन वर्षांपासून सुरत-हैद्राबाद या महामार्गासाठी शासनाकडून भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी याला विरोध केला. त्या प्रमाणे राहुरी येथील शेकडो शेतकर्‍यांनी भूसंपादन प्रकियेला यापूर्वी अनेक वेळा विरोध केला होता. त्यामुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना हात हलवत परतावे लागले होते. दरम्यान जिल्हाधिकारी व शेतकर्‍यांची अनेकवेळा बैठक झाली. मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. काल 10 ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा, राहुरी खुर्द व मोमीन आखाडा परिसरात एकाचवेळी पोलीस बंदोबस्त घेऊन अधिकारी मोजणीसाठी गेले. यावेळी मोमीन आखाडा परिसरात शेतकर्‍यांनी मोजणीला कडाडून विरोध करत अगोदर गुणांक दोन प्रमाणे भाव जाहिर करावा. त्या बाबत लेखी द्यावे. असा आग्रह शेतकर्‍यांनी धरला. जोपर्यंत गुणांक दोन प्रमाणे भाव जाहिर करत नाही. तोपर्यंत आम्ही प्रशासनाला कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नाही. प्रशासनाने जोर जबरदस्ती केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकर्‍यांनी दिला.

प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील यांनी शेतकर्‍यांना सहकार्य करुन मोजणी करुन देण्याची विनंती केली. मात्र शेतकरी त्यांच्या निर्णयावर ठाम होते. पोलीस बंदोबस्त घेऊन देखील अधिकारी शेतकर्‍यांसमोर हतबल झाले होते. तर शेतकरी रस्त्यावर शांतपणे ठाण मांडून बसले होते. त्यानंतर प्रांताधिकारी किरण सावंत यांनी शेतकर्‍यांना गुणांक दोन प्रमाणे मोबदला मिळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांसोबत शेतकर्‍यांची बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावर शेतकरी व प्रशासनाचे एकमत झाले.

यावेळी भारत भुजाडी, सुभाष वराळे, सुर्यकांत भुजाडी, गंगाधर सांगळे, राजेश वराळे, किशोर वराळे, नंदकुमार वराळे, जमीर अत्तार, बाबासाहेब शिंदे, अशोक वराळे, बाळासाहेब तोडमल, अशोक तोडमल, राजेंद्र वराळे, पांडूरंग वराळे, सुभाष भुजाडी, बाबासाहेब धोंडे आदिंसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com