सुरत-हैद्राबाद महामार्ग भूसंपादन प्रश्न ऐरणीवर

शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
सुरत-हैद्राबाद महामार्ग भूसंपादन प्रश्न ऐरणीवर
file photo

तळेगाव दिघे l वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील श्रीराम मंदिरात सुरत-हैद्राबाद एक्सप्रेस (ग्रीनफिल्ड) महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादन पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीची बैठक पार पडली.

सुरत - हैद्राबाद एक्सप्रेस महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु झाल्याने शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्या किंवा जमिनीच्या बदल्यात जमिनी द्या, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व शेतकरी कृती समितीचे नेते अविनाश सोनवणे यांनी दिला.

file photo
कसा असेल नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग? व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील श्रीराम मंदिरात शुक्रवारी (दि. १९) सुरत - हैद्राबाद एक्सप्रेस (ग्रीनफिल्ड) महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादन पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीची बैठक पार पडली. प्रसंगी अविनाश सोनवणे बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, अॅड. प्रशांत गुंजाळ, अॅड. अविनाश गोडगे, अॅड. सुहास गोर्डे, पंढरीनाथ इल्हे, विलास सोनवणे, किसन दिघे, नवनाथ राऊत, योगेश सोनवणे, संपतराव दिघे, बाळासाहेब दिघे, भाऊसाहेब दिघे सहित पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरत - हैद्राबाद एक्सप्रेस अधिसूचना जारी करीत भूसंपादन प्रक्रिया सुरु झाल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक बनले आहे. जमिनीचा योग्य मोबदला मिळवा, अन्यथा तिव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

अविनाश सोनवणे म्हणाले, सुरत - हैद्राबाद एक्सप्रेस ( ग्रीनफिल्ड ) महामार्गासाठी भूसंपादनात शेतकऱ्यांच्या जमिनी कायमस्वरूपी जाणार आहे. काही शेतकरी भूमिहीन होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळायला हवा. अन्यथा शासनाने शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमिनी द्याव्यात. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही, तर शेतकरी कृती समितीच्या बॅनरखाली तिव्र आंदोलन छेडले जाईल. आपण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेवून याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी करणार आहोत. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी लढावे लागेल असे सांगत जमीन लेव्हलला सदर रस्ता व्हावा. या तळेगाव भागात निळवंडे धरणाचे पाणी येणार असल्याने शेती बागायती होणार आहे. त्यामुळे सुरत - हैद्राबाद एक्सप्रेस रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या संभाव्य अडचणी लक्षात घ्याव्यात. पाईपलाईन नेण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आवश्यक तिथे सर्विस रस्ते करावेत, अशी मागणीही सोनवणे यांनी केली. प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, हौशीराम सोनवणे, प्रा. किसन दिघे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, अॅड. प्रशांत गुंजाळ, अॅड. सुहास गोर्डे यांची भाषणे झाली. भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा, अन्यथा तिव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com