सुरत-हैद्राबाद जलदगती महामार्ग भूसंपादीत क्षेत्रास योग्य मोबदला द्यावा

सुरत-हैद्राबाद जलदगती महामार्ग भूसंपादीत क्षेत्रास योग्य मोबदला द्यावा

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

सुरत - हैद्राबाद (ग्रीन फिल्ड) महामार्गासाठी संगमनेर तालुक्याच्या उत्तर भागातील भूसंपादीत होणार्‍या क्षेत्रास योग्य मोबदला मिळावा, अशी मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना भूसंपादीत प्रकल्पग्रस्त शेतकरी व शेतकरी कृती समितीने दिले.

निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव, अजमपूर, आरामपूर, तळेगाव, हसनाबाद, जुनेगाव, वडझरी, कासारे, लोहारे, मिरपूर, सादतपूर या गावांच्या जमिनी सुरत - हैद्राबाद जलदगती महामार्गासाठी भूसंपादीत होत आहेत. तळेगाव भागात निळवंडे धरणाचे पाणी येवून शेती बागायती होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा या रस्त्यास विरोध आहे. सुरत - हैद्राबाद जलदगती महामार्ग शासनाने करण्याचे ठरविल्यास रस्ता उंचीवरून न नेता जमीन लेव्हलने न्यावा. प्रस्तावित रस्त्याचे गाव व शिवार असे दोन भाग होणार असल्याने रस्त्याच्या योग्य ठिकाणी अंडरपास व सर्व्हिस रोड करण्यात यावेत.

निळवंडे धरणाचे पाणी आल्यावर शेतकर्‍यांना पाईपलाईन टाकण्यासाठी मोठे पाईप ठराविक अंतरावर टाकावेत. भूसंपादनाचा चौपट मोबदला देण्यात यावा. भूसंपादन होणार्‍या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे. शेतकरी भूमिहीन झाल्यास त्यास दुसरीकडे क्षेत्र द्यावे. घरे संपादित झाल्यास घरे बांधून द्यावीत. शासनाने प्रकल्पग्रस्त होणार्‍या शेतकर्‍यांच्या मागण्यांचा विचार न केल्यास सुरत - हैद्राबाद (ग्रीन फिल्ड) महामार्गास तिव्र विरोध करण्याचा इशाराही भूसंपादीत प्रकल्पग्रस्त शेतकरी व शेतकरी कृती समितीने दिला आहे.

यावेळी संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व शेतकरी कृती समितीचे नेते अविनाश सोनवणे, राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, प्रा. किसन दिघे, शिवाजी सुपेकर, नवनाथ राऊत सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com