सुरत-हैद्राबाद महामार्ग बाधित शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा - ना. थोरात

सुरत-हैद्राबाद महामार्ग बाधित शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दळणवळण साठी चौपदरी रस्ते हे अत्यंत गरजेचे आहे. सुरत-हैद्राबाद रस्त्यामुळे जिल्ह्यातील विकासाला आणखी चालना मिळण्यास नक्की मदत होणार आहे. याच बरोबर या रस्त्यासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहे त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालय या ठिकाणी सुरत- हैद्राबाद रस्त्या बाबतची बैठक संपन्न झाली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचीत, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राहुरीचे प्रांताधिकारी दयानंद जगताप, महामार्गाचे मिलिंदकुमार वावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर. आर. पाटील, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नामदार थोरात म्हणाले, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रस्त्यांचे चौपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. सुरत-हैद्राबाद या महामार्गामुळे अहमदनगर जिल्ह्याचे वैभव वाढणार असून या कामी ना. नितीन गडकरी यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. जिल्ह्यातून जाणार्‍या सुमारे शंभर किलोमीटर लांबीच्या या चौपदरीकरण रस्त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात आणखी भर पडणार आहे. हा रस्ता अद्यावत व वैभवशाली होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या रस्त्यामध्ये ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहेत त्या सर्व प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकार हे कायम विकासाच्या पाठीमागे राहिले असून सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा निर्माण करून देत त्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले.

नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, सुरत-हैद्राबाद रस्त्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा साईड रस्ते, त्याचप्रमाणे विविध ठिकाणी शेतकर्‍यांच्या पाईपलाईन आहेत, इतर बायपास रस्ते ही आवश्यकतेनुसार झाले पाहिजे, याबाबत दर आठवड्याला बैठक घेऊन चर्चेतून प्रश्नांची सोडवणूक हवी असेही ते म्हणाले.

यावेळी संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी व अहमदनगर जिल्ह्यातून जाणार्‍या विविध गावे व शेतकर्‍यांच्या समस्या नामदार थोरात व नामदार तनपुरे यांनी जाणून घेतल्या. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.

बैठकीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहे. या दोन वर्षात अनेक नैसर्गिक संकटं महाराष्ट्रावर आली. सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून लवकरच निर्णय घेवू, असे सांगत मंत्री थोरात म्हणाले, काँग्रेसवर टिका करणार्‍यांनी समजून घ्यावं की काँग्रेस एक विचाराचा पक्ष आहे. संकटं येतात आणि जातात. यापुढेही येणार्‍या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे. आगामी काळात विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा होईल, काँग्रेसची आजची स्थिती पाहिली तर दुःख वाटते या आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावर बोलतांना त्यांना दुःख वाटणारच, कारण आज काँग्रेस सत्तेत आहे, असा मिश्कील टोला ना. थोरात यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com