शेतकर्‍यांना बागायती शेतीचा दर मिळावा - खा. लोखंडे

शेतकर्‍यांना बागायती शेतीचा दर मिळावा - खा. लोखंडे

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

शिर्डी मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव, तळेगाव, वरझडी, लोहारे, कासारेसह राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमीनी सुरत- हैद्राबाद (ग्रीन फिल्ड) महामार्गात मोठ्या प्रमाणात जात आहे. आज जमिनी जरी कोरडवाहू असतील मात्र पुढील एक वर्षात निळवंडेच्या पाण्याने या जमिनी बागायती होणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना बागायती शेतीचा दर मिळायला पाहिजे, अशी भूमिका खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्पष्ट करीत भूसंपादनात शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव येथे खासदार सदाशिव लोखंडे यांनी काही प्रकल्प बाधित शेतकर्‍यांची भेट घेऊन भूमिका समजावून घेतली. प्रसंगी शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे यांच्यासह प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते.

खासदार लोखंडे म्हणाले, नवीन भूसंपादन धोरणनुसार कमी मोबदला दिला जाणार असल्याची चर्चा आहे. नवीन धोरणानुसार जमीन मोबदला कमी करण्यात आला आहे. मात्र शिर्डी लोकसभा मतदार संघात कोणत्याही शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही. आज जमिनी जरी कोरडवाहू असतील मात्र पुढील एक वर्षात निळवंडेच्या पाण्याने या जमिनी बागायती होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना बागायती शेतीचा दर मिळायला पाहिजे, अशी भूमिका खा. सदाशिव लोखंडे यांनी मांडली आहे.

तळेगाव दिघे, चिंचोलीगुरव परिसरातून देशातील दोन मोठ्या शहरांना जोडणारा सुरत हैद्राबाद हा बहुचर्चित प्रकल्प जात आहे. साहजिकच यात अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहेत. मात्र या जमिनी कवडीमोल भावाने जाऊ नयेत व त्याचा योग्य मोबदला मिळावा म्हणून काल शेतकर्‍यांनी खा. सदाशिव लोखंडे यांची भेट घेतली. याप्रश्नी लवकरात लवकर संबंधित अधिकार्‍यांची व शेतकर्‍यांची बैठक घेऊ व शेतकर्‍यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही खा. लोखंडे यांनी दिली.

आम्ही मागील 50 वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट पाहत आहोत व मागील दोन तीन वर्षापासून चांगल्या पावसामुळे थोडेसे सुखी होत असताना तसेच पुढील एक दोन वर्षात निळवंडेचे पाणी येणार या आशेत येथील शेतकरी आहे. त्यातच आता आम्हाला आमची जमीन सुरत-हैद्राबाद या महामार्गासाठी द्यावी लागणार आहे, अशी व्यथा प्रकल्प बाधित शेतकर्‍यांनी मांडली. आपल्या योगदानातून आमच्या जमिनी बागायती होणार असताना आम्हाला बागायती जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com